ब्लॅकमेलिंगला कंटाळून ठेकेदाराची आत्महत्या

महिलेविरुद्ध गुन्हा दाखल 
ब्लॅकमेलिंगला कंटाळून ठेकेदाराची आत्महत्या

औरंगाबाद - aurangabad

बांधकाम ठेकेदाराला प्रेमाच्या जाळ्यात ओढून काढलेले फोटो (photo) व्हायरल करण्याची धमकी दिली. तसेच बांधकाम केलेल्या घराचे तीन लाखही बुडवले. या सततच्या छळास कंटाळून ठेकेदाराने विष प्राशन करून आत्महत्या (suicide) केल्याची घटना बीड (Beed) बायपासवरील विठ्ठलनगरात घडली. या प्रकरणी पुंडलिकनगर पोलीस (police) ठाण्यात मयताच्या मुलाच्या तक्रारीवरून प्रेयसीविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला.

बीड बायपास रोडवरील विठ्ठलनगरातील शिवाजी वाघ हे बांधकाम ठेकेदार आहेत. घराशेजारी राहणारी महिलेच्या घराचे दुसऱ्या मजल्यावरील स्लॅबचे काम शिवाजी वाघ यांनी तीन लाख रुपयांत घेतले होते. घराचे बांधकाम करत असताना सदर महिलेने शिवाजी यांना प्रेमाच्या जाळ्यात ओढले. त्यांच्यात आलेल्या संबंधाचे फोटोशूट करून लताने शिवाजी यांना बांधकामाचे तीन लाख तर दिले नाहीच उलट ब्लॅकमेल करण्यास सुरुवात केली. दरम्यान, शिवाजी वाघ हे महिलेच्या घराचे काम घेतल्यापासून घरी पैसे देत नव्हते. उलट त्यांनी सहस्त्रमुळी येथील २६ गुंठे जमीन संभाजी उगले यांना विकली. त्याचेही पैसे घरी दिले नाही. त्यामुळे शिवाजी वाघ हे तणावात आले. २५ सप्टेंबर रोजी घरच्या मंडळींनी त्यांना सतत तणावात राहण्याचे कारण विचारले असता शिवाजी वाघ यांनी पत्नी व मुलांसमोर हकीकत सांगत चूक झाल्याची कबुली दिली. मोबाईलमध्ये फोटो काढून ती ब्लॅकमेल करत असल्याचे देखील सांगत ते घराबाहेर पडले. २५ सप्टेंबर रोजी रात्री दहा वाजेच्या सुमारास राहत्या घरी त्यांनी विष प्राशन केले. ते उलट्या करत असल्याने तात्काळ घरातील मंडळींनी शिवाजी यांना उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल केले. मात्र, उपचार सुरू असताना १ ऑक्टोबर रोजी पहाटे दोन वाजेच्या सुमारास त्यांचा मृत्यू झाला. या प्रकरणी पुंडलिकनगर पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक गणेश माने यांनी मुलगा कृष्णा शिवाजी वाघ याच्या तक्रारीवरून ब्लॅकमेल करून आत्महत्येस प्रवृत्त करणाऱ्या महिलेच्याविरोधात गुन्हा दाखल करून तपासाला सुरुवात केली आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com