लस न घेणे महागात पडले ; तिघांचा मृत्यू

औरंगाबादमधील घटना
लस न घेणे महागात पडले ; तिघांचा मृत्यू

औरंगाबाद - aurangabad

कोरोनाची (corona) तिसरी लाट आल्यानंतर पहिल्यांदाच १३ जानेवारी रोजी तीन रुग्णांचा मृत्यू झाला. यापूर्वी ५ जानेवारीला दोघांनी प्राण गमावले होते. गुरुवारी प्राण गमावलेले तिन्ही रुग्ण कोमॉर्बिड म्हणजे विविध व्याधींनी ग्रस्त होते. महत्त्वाचे म्हणजे तिघांनीही कोरोना प्रतिबंधक लस (Corona vaccine) घेतली नव्हती. त्यामुळे लसीकरणाकडे दुर्लक्ष करू नका. तातडीने लस घ्या, असे आवाहन सुपरस्पेशालिटीचे विशेष कार्याधिकारी (Dr. Sudhir Chaudhary) डॉ.सुधीर चौधरी यांनी केले आहे.

महाराष्ट्रात डिसेंबर अखेरीस ओमायक्रॉनचा शिरकाव झाला. जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात तिसरी लाट आली, असे म्हटले जाते. त्यामुळे दाखल झालेल्यांपैकी दोन रुग्णांचा मृत्यू तिसऱ्या लाटेत गुरुवारी झाला, असे काही डॉक्टरांचे म्हणणे आहे. घाटीत तिघांनाही व्हेंटिलेटरवर ठेवले होते. ६५ वर्षांच्या महिलेवर २३ दिवसांपासून उपचार सुरू होते. ती गंगापूर तालुक्यातील नेवरगाव येथील रहिवासी होती. २० डिसेंबर २०२१ रोजी तिला घाटीच्या सुपरस्पेशालिटी वार्डात दाखल करण्यात आले होते. तिला उच्च रक्तदाबाचा त्रास होत तसेच ती मधुमेही होती.

न्यूमोनिया झाल्यामुळे श्वसनाचा त्रास होत होता. गुरुवारी मृत्युमुखी पडलेला दुसरा रुग्ण चिकलठाणा येथील रहिवासी होता. त्यांचे वय ७८ होते. त्यांना हृदयविकाराचा त्रास होता. ते मधुमेही होते. उच्च रक्तदाबाचे शिकार झाले होते. त्यांना अत्यंत गंभीर अवस्थेतच १२ जानेवारी रोजी दाखल करण्यात आले होते. तिसरा रुग्ण नायगाव (ता. औरंगाबाद) येथील रहिवासी होता. त्यांचे वय ५१ होते. त्यांच्या दोन्ही किडन्या निकामी झाल्याने डायलिसिस सुरू होते. तोही गंभीर अवस्थेत असताना घाटीत आल्याचे डॉक्टरांनी सांगितले.

तिन्ही रुग्णांनी लस घेतली नव्हती, असे निदर्शनास आले आहे. यासंदर्भात डॉ. चौधरी म्हणाले की, ओमायक्रॉनचा कमी लेखू नका. लस घेतल्यास जिवावरील धोका टळू शकतो, हे लक्षात घ्या. तातडीने लस घ्या. याशिवाय मास्क वापरा, गर्दीत जाणे टाळा. दरम्यान, घाटीच्या दंत महाविद्यालयातील पाच, दोन निवासी डॉक्टर, नर्सिंगच्या दोन विद्यार्थिनी बाधित झाल्या असून त्यांच्यावर घाटीतच उपचार सुरू आहेत.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com