Friday, April 26, 2024
HomeUncategorizedऔरंगाबादमध्ये रोज साडेतीन हजार चाचण्या

औरंगाबादमध्ये रोज साडेतीन हजार चाचण्या

औरंगाबाद – Aurangabad

आजघडीला शहरात कोरोनाची दुसरी लाट ओसरल्यात जमा झाल्याची स्थिती आहे. शहरात कोरोनाचे केवळ 14 रुग्ण आढळले. त्यामुळे शनिवारचा पॉझिटिव्हिटी रेट हा एक टक्क्यापेक्षाही कमी केवळ 0.46 टक्के तर रविवारी 0.64 टक्के एवढा नोंदला गेला. लाट ओसरत असली तरी खबरदारी म्हणून प्रशासनाकडून विविध पथके व आरोग्य केद्रांतून नित्याने तीन ते साडेतीन हजार कोरोना चाचण्या केल्या जात आहेत. तिसरी लाट थोपवण्याचा प्रशासनाचा यामागचा उद्देश आहे.

- Advertisement -

औरंगाबाद शहरात कोरोनाच्या दुसर्‍या लाटेने मार्च आणि एप्रिल महिन्यात चांगलेच थैमान घातले होते. त्यावेळी रोजचे हजार ते दीड हजार रुग्ण नव्याने आढळत असल्याने शहरात रुग्णांसाठी बेड्स कमी पडू लागले होते. या परिस्थितीतही प्रशासनाने संयमाने कोरोना चाचण्या वाढवत विविध उपाययोजना प्रभावीपणे राबवल्या.

परिणामी, मे महिन्यातपासून शहरासह जिल्ह्यातील ग्रामीण भागातही रुग्ण कमी होण्यास सुरूवात झाली. मागील महिनाभरात रुग्णसंख्या कमी कमी होत शनिवारी शंभराच्या आत केवळ 95 रुग्ण पूर्ण जिल्ह्यात आढळले. त्यातही शहरात केवळ 15 रुग्ण आढळले. शनिवारी शहरात दिवसभरात पालिकेची मोबाइल पथके, सिटी एन्ट्री पॉइंट, आरोग्य केंद्रे, प्रशासकीय कार्यालये व विमानतळ आणि रेल्वेस्टेशन या सर्व ठिकाणी एकूण 3,693 कोरोना चाचण्या करण्यात आल्या. कोरोनाची संख्या शहरात घटत असली तरी पालिका प्रशासनाकडून खबरदारी म्हणून नियमित प्रतिदिन तीन ते साडेतीन हजार नागरिकांच्या कोरोना चाचण्या केल्या जात आहेत. जुलैनंतर आरोग्य तज्ज्ञांनी कोरोनाच्या तिसर्‍या लाटेची शक्यता वर्तवली आहे. त्यामुळे तिसरी लाट येऊ न देण्यासाठी चाचण्यांचे प्रमाण कायम ठेवण्यात आल्याचे सांगितले जाते.

दीड महिन्यापूर्वी शहरातील कोरोनाच्या सक्रीय रुग्णांची संख्या ही दहा हजारांच्या घरात पोहचली होती. त्यामुळे बेड्स अपुरे पडत असल्याने सौम्य लक्षणे असलेल्या तब्बल चार हजार बाधितांवर घरीच उपचार केले जात होते. मात्र आता परिस्थिती बदलली असून रविवारपर्यंत शहरात केवळ 139 बाधितांवर विविध रुग्णालयांत उपचार सुरू आहेत. यापैकी 33 रुग्ण हे घरीच उपचार घेत आहेत. तर सर्वाधिक 36 रुग्ण मेल्ट्रॉनमध्ये दाखल आहे.

कोरोनाच्या दुसर्‍या लाटेत शहरात मृत्युचे प्रमाण अधिक वाढले होते. त्यामुळे रिकव्हरी रेट अर्थातच रुग्णांचे बरे होण्याचे प्रमाण हे 78 टक्क्यांपर्यंत खालावले होते. त्यामुळे आरोग्य यंत्रणा चिंतेत पडली होती. मात्र मागील महिनाभरात रुग्णसंख्या कमी होण्याबरोबरच रिकव्हरी रेटमध्येही सुधारणा झाल्याने आरोग्य यंत्रणेला दिलासा मिळाला आहे. पालिकेच्या अहवालानुसार शहराचा शनिवारचा रिकव्हरी रेट 97.65 टक्के एवढा नोंदला गेला.

- Advertisment -

ताज्या बातम्या