Sunday, April 28, 2024
HomeUncategorized'समृद्धी'वर वाहनांची कसून तपासणी ; वाहनांच्या फिटनेसवर भर

‘समृद्धी’वर वाहनांची कसून तपासणी ; वाहनांच्या फिटनेसवर भर

छत्रपती संभाजीनगर – Chhatrapati Sambhajinagar

समृद्धी महामार्गावर (Highway) काही दिवसांपूर्वीच बुलढाणा जिल्ह्यात ट्रॅव्हल्स बसचा मोठा अपघात झाला होता. या अपघातात तब्बल २५ जणांचा होरपळून मृत्यू झाला होता. या घटनेनंतर परिवहन विभागाने खासगी ट्रॅव्हल्सच्या विरोधात राज्यव्यापी धडक तपासणी मोहीम सुरू केली आहे. या मोहिमेत आतापर्यंत ४९ बसगाड्यांची तपासणी केली. मात्र, या मोहिमेत एकही मद्यपी चालक सापडला नसल्याचा दावा परिवहन विभागाने केला आहे.

- Advertisement -

समृद्धी महामार्गावर खासगी बसच्या झालेल्या अपघातानंतर या बसचा चालक मद्य प्राशन केलेल्या अवस्थेत होता, असा निष्कर्ष समोर आला आहे. या गंभीर प्रकारामुळे राज्याचे परिवहन आयुक्‍त विवेक भीमनवार यांनी राज्यातील सर्व आरटीओ अधिकाऱ्यांची तातडीची बैठक बोलावली होती. या बैठकीत आपापल्या हद्दीमध्ये रात्री धावणाऱ्या चालकांची ठिकठिकाणी ब्रेथ अॅनालायझर तपासणी करण्याच्या सूचना दिल्या होत्या. छत्रपती संभाजीनगर प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या वतीने बुधवारी रात्रीपासून ही मोहीम सुरू करण्यात आली. याबरोबरच वाहनाचे फिटनेस, टॅक्स, चालकाचा परवाना, दूरच्या प्रवासासाठी दोन चालक आहेत किंवा नाही, हेडलाईट, वाहनाच्या खिडक्या, वाहनाचे संकटकालीन दरवाजे उघडतात किंवा नाही, वाहनाचे टायर, पुरेसा इंधनसाठा, वाहनाची लांबी, आसनव्यवस्थेत काही बदल केला काय, अशा विविध बाबींची तपासणी सुरू झाली आहे. जिल्ह्यामध्ये लिंबेजळगाव टोल नाका आणि समृद्धी महामार्गावरील वेरूळ येथे ट्रॅव्हल्स बसच्या रात्री उशिरापर्यंत तपासण्या करण्यात आल्या आहेत. यात तब्बल ४९ वाहनांची तपासणी करण्यात आली. 

या मोहिमेत मोटार वाहन निरीक्षक हीना सौदागर, योगेश सरोदे, दीक्षा आढाव, नम्रता शिंदे, दीपिका जोशी, सचिन मगरे, विक्रम गवळी, नितीन राठोड, प्रदीप राठोड, माधवी चत्रे, भाग्यश्री देशमुख, मकरंद जायभाये, राहुल बांगर, जयश्री सोळंके, संजय गांगोडे, शिवशंकर धोंडे, अरुणा लहामगे, विकास डोंगरे, पूजा कुचे, राजश्री सोळंके व कांचन जाधव आदींचा पथकात सहभाग आहे. राज्य परिवहन आयुक्तांनी दिलेल्या सूचनेप्रमाणे अपघातांच्या अनुषंगाने ट्रॅव्हल्स बसची कसून तपासणी सुरू केली आहेत. जिल्ह्यात रात्रीच्या वेळी धावणार्‍या बसेसची तपासणी करण्यासाठी दोन पथके तैनात केली आहेत. या बसेस बारकाईने तसेच कसून तपासल्या जात असल्याची माहिती प्रभारी प्रादेशिक परिबहन अधिकारी विजय काठोळे यांनी दिली.

- Advertisment -

ताज्या बातम्या