तूर्तास मराठवाड्यात पावसाची शक्यता नाही!

खरीपाच्या पेरण्या खोळंबल्या
तूर्तास मराठवाड्यात पावसाची शक्यता नाही!

औरंगाबाद - Aurangabad

मराठवाड्यात पावसाची उघडीप कायम असल्याने चिंता वाढली आहे. पाच जुलैपासून मध्यम ते जोरदार पावसाला (Heavy rain) सुरुवात होईल, असा हवामान तज्ज्ञांचा अंदाज आहे. पेरणीसाठी समाधानकारक पाऊस नसल्याने काही भागात खरीपाच्या पेरण्या खोळंबल्या आहेत.

मराठवाड्यात तीन आठवड्यांपासून पावसाने दडी मारली आहे. खरीप हंगामासाठी पुरेसा पाऊस झाला नसल्याने चिंता वाढली आहे. पूर्वमोसमी पावसाचे जोरदार आगमन झाल्यानंतर मोसमी पाऊस समाधानकारक होणे अपेक्षित होते. मात्र, पावसाची उघडीप कायम असल्याने विभागातील विविध भागात पेरण्या खोळंबल्या आहेत. तसेच पेरण्या झालेल्या भागातील पिके कोमेजली आहेत. हिंगोली, परभणी, उस्मानाबाद आणि बीड (Hingoli, Parbhani, Osmanabad, Beed) जिल्ह्यात पावसाने पाठ फिरवली आहे. विभागात जून महिन्यात गेल्या वर्षीच्या तुलनेत निम्मा पाऊस झाला आहे. औरंगाबाद जिल्ह्यात १४८.४ मिलिमीटर पाऊस पडला आहे. गेल्या वर्षी जूनअखेर २८७.६ मिमी पाऊस झाला होता. विभागात जून अखेरीस १९९ मिमी पावसाची नोंद झाली आहे.

कमी कालावधीत जास्त पाऊस झाल्याने सरासरीच्या जवळपास पाऊस पडल्याचे दिसत आहे. पण, दोन पावसातील अंतर जास्त आहे. पावसातील खंडामुळे शेती आणि जलसाठ्यांवर परिणाम झाला आहे.पावसाने उघडीप दिल्यामुळे जून महिन्यापासून धरणाची पाणीपातळीत वाढ होऊ शकली नाही. जायकवाडी धरणात ३२.९० टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. निम्न दुधना (५९.६५ टक्के), येलदरी (५६.४७), सिद्धेश्वर (१८.३५), माजलगाव (२०.४५), मांजरा (१७.१३), पेनगंगा (४८.८७), मानार (३७.२२), निम्न तेरणा (४०.१०), विष्णुपुरी (८३.४०), सीना कोळेगाव (-१.०८), शहागड बंधारा (८.५५) आणि खडका बंधारा (१००टक्के) असा विभागाचा धरणनिहाय पाणीसाठा आहे. मध्यम आणि लघु प्रकल्पात पाणी पातळी घटत आहे. जुलै महिन्यात नियमित पाऊस झाल्यानंतर पाणी पातळी वाढणे अपेक्षित आहे.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com