औरंगाबादेत 18 वर्षांवरील नागरिकांसाठी केवळ तीनच केंद्र

300 जणांचे लसीकरण केले जाणार
औरंगाबादेत 18 वर्षांवरील नागरिकांसाठी केवळ तीनच केंद्र

औरंगाबाद - Aurangabad

महाराष्ट्र दिनी शनिवारी महापालिकेच्या वतीने शहरातील तीन आरोग्य केंद्रावर 18 वर्षावरील नागरिकांच्या लसीकरणाला प्रारंभ झाला. पहिल्या दिवशी 300 पैकी 139 नागरिकांनी लस घेतली. लसीकरणासाठी तरूणांमध्ये उत्साह दिसून आला. मात्र केवळ तीनच केंद्रांवर लसीकरण सुरू झाल्याने अनेकांचा हिरमोड झाला आहे. कोविड अ‍ॅपवरही नोंदणीत अडचणी येत असल्याने अनेकजण संभ्रमात आहेत.

पालिका प्रशासक तथा आयुक्त अस्तिककुमार पांडेय यांच्या आदेशावरुन मुकुंदवाडी, कैसर कॉलनी व सादातनगर या तीन आरोग्य केंद्रात 18 ते 44 वयोगटातील नागरिकांच्या लसीकरणाला प्रारंभ करण्यात आला.

शनिवारी दुपारी दोन वाजता मुकुंदवाडी आरोग्य केंद्रात लसीकरण मोहिमेचे उद्घाटन आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. नीता पाडळकर, उपायुक्त अपर्णा थेटे, वैद्यकीय अधिकारी डॉ. अंजली पाथ्रीकर, शिक्षणाधिकारी रामनाथ थोरे, सांस्कृतिक अधिकारी संजीव सोनार यांच्या उपस्थितीत करण्यात आले. लस घेण्यासाठी युवकांमध्ये उत्साह दिसून आला. 18 ते 44 वर्ष वयोगटातील नागरिकांना कोविन अ‍ॅपव्दारे नोंदणी करावी लागत आहे. तीन केंद्रावर प्रत्येकी 100 नागरिकांनाच लस दिली जाणार आहे. लसीकरण मोहिमेसाठी लहू घोडके, अस्मिता बुक्तारे, आस्मिता वाघमारे, सिस्टर सुनंदा चव्हाण, मनीषा कोकाटे, कांतीलाल भोये यांनी परिश्रम घेतले.

18 ते 44 वर्षांवरील नागरिकांना आता रोज तीन केंद्रांवर 300 जणांचे लसीकरण केले जाणार आहे. त्यानुसार सकाळी 10 ते सायंकाळी 6 वाजेदरम्यान मुकुंदवाडी, कैसर कॉलनी व सादातनगर या केंद्रांवर लसीकरण सुरू राहणार आहे. या तीनही केंद्रावर प्रत्येकी शंभर या प्रमाणे तिनशे नागरिकांनाच रोज लस टोचली जाणार आहे.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com