गौण खनिजांची चोरी पकडली

हायवा ट्रक जप्त
गौण खनिजांची चोरी पकडली

औरंगाबाद - aurangabad

औरंगाबाद जिल्ह्यात गौण खनिजांची अवैध वाहतूक करणाऱ्या वाहनधारकाविरुद्ध महसूल विभागाने कारवाईची मोहीम हाती घेतली आहे. अपर तहसील कार्यालयाने रात्री दहा ते पहाटेपर्यंत कारवाई करत चार वाहने जप्त करत चोरट्यांवर महसूल विभागाने दणका दिला. याप्रकरणी संबंधितांकडून सुमारे १२ लाखांचा दंड आकारला जाणार आहे. 

दरम्यान, ताब्यात घेण्यात आलेली ही वाहने छावणी व एमआयडीसी सिडको पोलिस स्टेशन तसेच तहसील कार्यालय आवारात पुढील कार्यवाही कामी जमा करण्यात आली आहेत. त्यामुळे बेकायदा मुरूम वाहतूक करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहे. जिल्हाधिकारी आस्तिककुमार पांडेय यांच्या मार्गदर्शनाखाली उपविभागीय अधिकारी रामेश्वर रोडगे व अपर तहसीलदार विजय चव्हाण यांच्या संयुक्त पथकाने ही कारवाई केली. पोलिस उपायुक्‍त शौलवंत नांदेडकर यांनीही या कारवाईदरम्यान पथकास मदत केली. पथकाने शासकीय वाहने न वापरता खासगी वाहने घेत ही कारवाई केली. रात्री दहा वाजेपासून या कारवाईला सुरुवात झाली. त्यासाठी वेगवेगळे पथक स्थापन करण्यात आले होते. नगर नाका येथून वाळूची चोरटी वाहतूक हायवा ट्रकद्वारे होत असल्याचे समजताच पथकाने त्या संशयित वाहनाचा पाठलाग करत ते वाहन सिटी चौक परिसरात ताब्यात घेतले. तर पैठण रोडवर अन्य वाळूची चोरटी वाहतूक करणारा ट्रक ताब्यात घेण्यात आला.

या कारवाई दरम्यान पोलिस आयुक्‍त नांदेडकरही या पथकासमवेत होते. यासह जळगाव रोड तसेच नायगाव रोडवर मुरुमाची वाहतूक करणारे दोन वाहने पथकाने पकडले. या पथकात तलाठी योगेश पंडित, गणेश गाडेकर, स्वप्नील शेळके यांच्यासह अन्य कर्मचारी होते. ताब्यात घेण्यात आलेल्या या वाहनावर महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम, मोटार वाहन अधिनियम इतर आनुषंगिक कायद्यान्वये कार्यवाही करण्यात येत असल्याचे सूत्रांनी सांगितले.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com