पुन्हा लॉकडाऊन होण्याच्या भीतीने मजुरांचे पलायन सुरू 

सचखंड एक्स्प्रेसला गर्दी वाढली 
पुन्हा लॉकडाऊन होण्याच्या भीतीने मजुरांचे पलायन सुरू 

औरंगाबाद - Aurangabad

राज्यात पुन्हा कोरोनाचा उद्रेक सुरु झाला आहे. त्यामुळे राज्यात पुन्हा लॉकडाउन लागू करण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. या पार्श्वभूमीवर परराज्यातून औरंगाबाद तसेच आसपासच्या भागात काम करण्यासाठी आलेले युवक आणि त्यांचे कुटुंबांच्या पुन्हा परतीच्या प्रवासाला निघाल्याची माहिती समोर आली आहे.

या स्थलांतरामुळे औरंगाबादहून दिल्लीकडे जाणार्‍या सचखंड एक्सप्रेससाठी गर्दी वाढली आहे. राज्यात लॉकडाउनची चाहूल लागल्याने रविवारी औरंगाबाद रेल्वे स्थानकावर नांदेडहून अमृतसरला जाणार्‍या सचखंड एक्सप्रेसची वाट पाहत उभे असलेल्या प्रवाशांमध्ये अनेक जण हे उत्तर प्रदेश, बिहार आणि छत्तीसगड भागातील तरुण आले. याशिवाय परराज्यात राहणार्‍या अनेक कुटूंबीय देखील रेल्वेची वाट पाहत उभे होते. मागील लॉकडाऊनमध्ये परराज्यात राहणार्‍या अनेक मजुरांना पायी जावे लागले होते.

लॉकडाऊन संपल्यानंतर यातील अनेक जण परत व्यवसाय करण्यासाठी औरंगाबादला आले होते. यातील अनेकांनी पुन्हा आपला पुर्ववत व्यवसाय सुरू केला होता. मात्र शहरात कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे नाईट कर्फ्यु आणि दोन दिवसांचा कडक लॉकडाऊन लागू केला आहे. त्यापाठोपाठच आता राज्यात पंधरा दिवसांसाठी लॉकडाऊन किंवा निर्बंध लावण्याचा राज्य शासनाचा विचार सुरू आहे. त्यामुळे पुन्हा लॉकडाऊन लागण्याच्या भीतीने परराज्यातील मजुरांनी स्थलांतर करणे सुरु केले आहे.

गेल्या दोन ते तीन दिवसापासून सचखंड एक्सप्रेसला गर्दी वाढलेली आहे. तसेच औरंगाबादहून दर आठवड्याला जाणार्‍या मराठवाडा क्रांती एक्सप्रेस नांदेड ते हजरत निझामुद्दीन एक्सप्रेसलाही गर्दी वाढल्याची माहिती रेल्वे अधिकार्‍यांकडून देण्यात येत आहे.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com