कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत बालकांसह युवकांचाही बळी

चार दिवसांत तिघांचा मृत्यू
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत बालकांसह युवकांचाही बळी

औरंगाबाद - Aurangabad

कोरोनाच्या या दुस-या लाटेत बालकांसह युवकांचाही बळी जात आहे. मागील चार दिवसांतच दोन अल्पवयीन मुले आणि एका 21 वर्षीय युवकाचा मृत्यू झाला आहे. कोरोनाची लागण झाल्यानंतर उशीराने उपचारासाठी दाखल झाल्याने त्यांचा मृत्यु झाल्याचे समोर येत आहे. यामुळे लहान मुले, तसेच युवक आजारी पडल्यास त्यांची चाचणी करून त्यांना कोरोनाची लागण झाल्यास लगेच उपचारासाठी दाखल करावे, असा सल्ला आरोग्य तज्ज्ञांनी दिला आहे.

मार्च महिन्यापासून कोरोनाच्या दुस-या लाटेने ग्रामीण भागासह औरंगाबाद शहरात थैमान घातले आहे. कोरोनाच्या दुस-या लाटेतील कोविडचा विषाणू हा अधिक घातक ठरत आहे. पहिल्या लाटेपेक्षा या दुस-या लाटेत रुग्णसंख्या झपाट्याने वाढत असून मृत्यूचे प्रमाणही अधिक दिसून येत आहे. आजवर कोरोनामुळे वयोवृद्ध नागरिकांचाच मृत्यू होत होता. मात्र दुस-या लाटेत बालकांसह युवकांचाही मृत्यू होत असल्याचे समारे येत आहे.

शहरात मागील चार दिवसांत 10 ते 21 वयोगटातील तिघांचा मृत्यू झाल्याने आरोग्य यंत्रणेकडून चिंता व्यक्त केली जात आहे. 18 एप्रिल रोजी आंबेडकरनगर येथील 13 वर्षीय मुलीचा घाटीत उपचारादरम्यान मृत्यू झाला. त्याच्याच दुस-या दिवशी 19 तारखेला आंबेडकरनगरच्या बाजूलाच असलेल्या आरतीनगर येथील 21 वर्षीय युवकाचा कोरोनाने बळी घेतला. या मुलालाही गंभीर अवस्थेत घाटीत दाखल केले होते. तर आनंदनगर येथील 17 वर्षीय मुलाचा कोरोनाने मृत्यू झाला. या तिनही मुलांना 15, 16 व 18 एप्रिल रोजी घाटीत उपचारासाठी दाखल करण्यात आले होते, असे पालिकेच्या अहवालात नमूद केले आहे.

पालिकेकडून प्राप्त अहवालानुसार आजवर कोरोनाचे शहरात शून्य ते अठरा वर्षे वयोगटातील 8 हजार 87 मुले बाधित झाली आहेत. यात शून्य ते पाच वयोगटातील 1174 बालके तर पाच ते अठरा वयोगटातील 6913 मुला-मुलींचा समावेश आहे.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com