Monday, April 29, 2024
HomeUncategorizedसव्वाशे कोटींचे हिरे लुटण्याचा डाव उधळला

सव्वाशे कोटींचे हिरे लुटण्याचा डाव उधळला

छत्रपती संभाजीनगर – Chhatrapati Sambhajinagar

हिरे व्यवसाय (Diamond business) बाजारातील प्रसिद्ध ‘स्टार रेज’ या इंटरनॅशनल कंपनीच्या कॉर्पोरेट बँक खात्याचा आयडी आणि पासवर्ड चोरून हॅकरच्या मदतीने ११० कोटी रुपये क्रिप्टो करन्सीमध्ये कन्व्हर्ट करण्याच्या तयारीत असलेल्या सहा सायबर भामट्यांना सायबर पोलिसांनी (Cyber ​​Police) बेड्या ठोकल्या. या भामट्यांना शहरातील मध्यवर्ती बसस्थानक परिसरातील देवप्रिया हॉटेलमधून ताब्यात घेण्यात आले.

- Advertisement -

मुंबई येथील स्टार रेज या इंटरनॅशनल हिरे विक्री करणाऱ्या कंपनीचे बँक ऑफ इंडियाच्या मुंबई येथील ओपेरा हाऊस या शाखेत खाते आहे. या कॉर्पोरेट बँक खात्यात ११० कोटी रुपये जमा आहेत. या बँक खात्याचा आयडी आणि पासवर्ड छावणी परिसरातील गवळीपुरा येथील शेख इरफान शेख उस्मान (२३), वसीम इसाक शेख (३६, मदिना गल्ली, पडेगाव), शेख कानित शेख अय्युब (१९, फ्लॅट क्र. २१, रूपमहाल कॉम्प्लेक्स, कलेक्टर ऑफिस रोड), अब्बास युनूस शेख (३४, रा. मिटमिटा), अमोल साईनाथ करपे (२५) आणि कृष्णा बाळू करपे (२५, दोघेही रा. कोडापूर, झांजर्डी , पो. सोलेगाव, ता. गंगापूर) यांनी मिळविला होता. या खात्यावरील ही रक्‍कम सहा जण इंटरनेट बँकिंगच्या मदतीने बँकेच्या वेबसाईटद्वारे हॅकरचा वापर करून हस्तांतरित करून त्याचे क्रिप्टो करन्सीमध्ये रूपांतर करण्याच्या प्रयत्नात असल्याची गोपनीय माहिती सायबर पोलिसांना खबऱ्यामार्फत मिळाली होती. 

पोलिसांनी देवप्रिया हॉटेल, कार्तिकी सिग्नल येथे छापा मारून सहा जणांना ताब्यात घेतले. त्यांची विचारपूस केली, तेव्हा स्टार रेज कंपनीच्या बँक खात्याची व इंटरनेट बँकिंगची माहिती असलेली चॅटिंग त्यांच्या सोशल मीडिया ऍपवर दिसून आली. या कंपनीसह आणखी २० कॉर्पोरेट कंपन्यांच्या बँक खात्यांची व इंटरनेट बँकिंगची देखील सर्व माहिती त्यांच्याकडे आढळून आल्याची माहिती सायबर पोलीस ठाण्याच्या निरीक्षक प्रवीणा यादव यांनी दिली.

 
पोलिसांनी ६ मोबाईलसह दोन लॅपटॉप आणि कागदपत्रे जप्त करून सायबर पोलीस ठाण्यात रविवारी रात्री उशिरा गुन्हा दाखल केला आहे. ही कारवाई पोलीस आयुक्‍त मनोज लोहिया, पोलीस उपायुक्‍त अपर्णा गिते, सहायक पोलीस आयुक्‍त (गुन्हे) धनंजय पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सायबर पोलीस ठाण्याच्या निरीक्षक प्रवीणा यादव, सहायक निरीक्षक अमोल सातोदकर, उपनिरीक्षक राहुल चव्हाण, जमादार संजय साबळे, चंद्रकांत दंडे, रामेश्‍वर काळे, सुशांत शेळके, वैभव वाघचौरे, अमोल देशमुख, सचिन संपाळ, श्याम गायकवाड, गोकुळ कुनरवाडे, अमोल सोनटक्के, अभिलाष चौधरी, संदीप पाटील, प्रवीण कुऱ्हाडे व चालक कांबळे यांनी केली.

विशेष म्हणजे या टोळीत कोडापूर-झांजर्डीच्या उपसरपंचाचा सहभाग या टोळीत इरफान आणि वसीम हे दोघे मास्टरमाइंड आहेत. इरफानचा हॉटेलचा व्यवसाय आहे तर वसीम शेख हा गारखेडा येथील बिल बॉक्स कंपनीत कामाला आहे. शेख कानित याचे एम.टेक. चे शिक्षण झाले आहे. अब्बास शेख याचा बेल्डिंगचा व्यवसाय आहे. अमोल करपे हा कोडापूर, झांजर्डी गावचा उपसरपंच आहे तर त्याचा चुलतभाऊ कृष्णा करपे याचे किराणा दुकान आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या