आता घरी जाऊन देणार लसीचा दुसरा डोस

औरंगाबाद महापालिकेचा उपक्रम
आता घरी जाऊन देणार लसीचा दुसरा डोस

औरंगाबाद - aurangabad

कोरोना (corona) लसीकरणाचे (Vaccination) प्रमाण वाढविण्यासाठी मनपाने आता घरपोच सेवा सुरू केली आहे. दुसरा डोस न घेणाऱ्यांच्या घरी जाऊन डोस देण्यात येतील. तसेच (Ramadan) रमजाननिमित्त तीन (Health Center) आरोग्य केंद्र आणि दोन दुकानांमध्ये सायंकाळी ४ ते रात्री १० वाजेदरम्यान लसीकरण सुरू राहणार आहे. मनपाचे आरोग्य अधिकारी डॉ.पारस मंडलेचा (Health Officer Dr. Paras Mandalecha) यांनी ही माहिती दिली.

शहरात लसीकरणाची टक्केवारी सरासरी ८१ टक्क्यांवर पोहोचली आहे. पण पहिला डोस ९० टक्के व दुसरा डोस ७० टक्के घेण्याचे उद्दिष्ट पूर्ण करावे लागणार आहे. त्यासाठी मनपाचे प्रशासक आस्तिककुमार पांडेय व आरोग्य अधिकारी डॉ. पारस मंडलेचा यांनी शनिवारी ४० आरोग्य केंद्रांतील डॉक्टर, नर्स, डेटा एंट्री ऑपरेटर अशा एकूण १३० अधिकारी, कर्मचाऱ्यांची आढावा बैठक घेतली. रोजा असणारे नागरिक लसीकरणापासून वंचित राहू नये याकरिता सिडको एन-८ रुग्णालय, सिल्क मिल कॉलनी रुग्णालय, कैसर कॉलनी रुग्णालय या तीन रुग्णालयांत सायंकाळी ४ ते रात्री १० वाजेपर्यंत लसीकरण सुरू ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला.

पैठण (Paithan) गेट येथील फॅशन बाजार (Fashion market) व सिटी चौक येथील सामी कटपीस सेंटर अशा दोन ठिकाणी सायंकाळी ४ ते रात्री १० वाजेपर्यंत लसीकरण केले जाईल. दुसरा डोस बाकी असणाऱ्या नागरिकांची यादी आरोग्य केंद्रानिहाय वैद्यकीय अधिकारी यांना देण्यात आली आहे. लसीकरण केंद्रावर न येणाऱ्या नागरिकांना त्यांच्या घरी जाऊन लसीकरण केले जाणार असल्याचे डॉ. पारस मंडलेचा यांनी सांगितले.

एकही नवा रुग्ण नाही

औरंगाबाद जिल्ह्यात कोरोनाचा एकही नवा रुग्ण आढळला नाही. तर उपचार घेत असलेल्यापैकी एकाही बाधिताचा मृत्यू झालेला नाही. सध्या फक्त सात जणांवर उपचार सुरू आहेत. जिल्ह्यातील एकूण बाधितांची संख्या १,६९,७७० झाली. त्यापैकी १ लाख ६६ हजार ३१ जण बरे झाले तर ३,७३२ जणांचा मृत्यू झाला आहे.

Related Stories

No stories found.