पॅसेंजर रेल्वे टप्प्याटप्प्याने सुरू होणार 

'दमरे'कडून प्रवाशांना दिलासा 
पॅसेंजर रेल्वे टप्प्याटप्प्याने सुरू होणार 

औरंगाबाद- Aurangabad

औरंगाबाद रेल्वे मार्गावर अजूनही पॅसेंजर सेवा बंद असून, एक्स्प्रेसमध्येही जनरल डब्यांमधून प्रवासाला मनाई आहे. त्यामुळे, सामान्य आणि ऐनवेळी प्रवासाचे नियोजन झालेल्या प्रवाशांना नाहक मनस्ताप सहन करावा लागत आहे. यातून आता मार्ग निघणार असून, औरंगाबाद रेल्वे मार्गावर चालणाऱ्या पॅसेंजर रेल्वे ऑक्टोबर महिन्यात सुरू करण्याची माहिती दक्षिण-मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक गजानन माल्या यांनी दिली.

मराठवाडा प्रवासी महासंघाच्या पदाधिकाऱ्यांनी सिकंदराबाद येथे दक्षिण-मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक गजानन माल्या यांची भेट घेतली. या भेटीत त्यांनी प्रवासी रेल्वेबाबतच्या अडचणी मांडल्या. नांदेड-औरंगाबाद मार्गावरील शहरांतून अनेक जण औरंगाबाद, नांदेड, परभणी तसेच अन्य शहरांत जात असतात.

या प्रवाशांची पॅसेंजरद्वारे सोय होत होती. करोनाच्या प्रादुर्भावानंतर पॅसेंजर रेल्वे बंद करण्यात आलेली आहे. यामुळे या भागातील नागरिकांना मोठ्या आर्थिक संकटातून जावे लागत आहे. दक्षिण-मध्य रेल्वे विभागाने हैदराबादसह अन्य भागात पॅसेंजर तसेच डेमू रेल्वे सुरू केल्या आहेत. मात्र, नांदेड विभागात पॅसेंजर रेल्वे किंवा डेमू रेल्वे सुरू करण्यात आलेली नाही.

एक्स्प्रेस रेल्वेत सर्वसामान्यांसाठी काही राखीव रेल्वे कोच देण्यात येत होते. मात्र, एक किंवा दोन एक्स्प्रेस रेल्वे वगळता इतर कोणत्याही रेल्वेत सामान्यांसाठी जनरल डबे ठेवण्यात आलेले नाही. याबाबत दक्षिण मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक गजानन माल्या यांनी मुख्य वाहतूक प्रबंधक बी. नाग्या यांनाही या प्रश्नाबाबत माहिती दिली. माल्या यांनी ऑक्टोबरमध्ये सर्व पॅसेंजर रेल्वे टप्प्या टप्प्याने सुरू करण्यात येणार असल्याची माहिती महासंघाचे अध्यक्ष अरूण मेघराज यांच्यासोबत मोहम्मद कादरी, कन्हैय्या लाल, अहमद चाऊस असलेल्या शिष्टमंडळाला दिली.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com