पुढील चार दिवस पावसाचे!

मराठवाड्यात सर्वत्र मुसळधार
पुढील चार दिवस पावसाचे!

छत्रपती संभाजीनगर - Chhatrapati Sambhajinagar


मराठवाड्यात (Marathwada) पुढील तीन-चार दिवस मध्यम ते हलक्या स्वरूपातील पावसाची (rain) शक्‍यता आहे. दोन दिवसांपासून ढगाळ वातावरण असून त्याचा फळबागांवर परिणाम झाला आहे. वादळी वाऱ्यासह पाऊस झाल्यास पिकांचे नुकसान होण्याची भीती आहे.

मराठवाड्यातील आठही जिल्ह्यात अवकाळी पावसाचा अंदाज आहे. पाच ते आठ मार्च या कालावधीत पावसाच्या सरी कोसळण्याची शक्‍यता आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात तुरळक ठिकाणी गडगडाटासह हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्‍यता आहे, या चार दिवसांत काही ठिकाणी वादळ, विजांचा कडकडाटासह हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होईल, असे वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठआच्या ग्रामीण कृषि मौसम सेवेने म्हटले आहे. जालना जिल्ह्यातही हलक्या सरी पडण्याचा अंदाज आहे. परभणी जिल्ह्यात सहा ते आठ मार्चला तुरळक ठिकाणी हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. बीड, हिंगोली, नांदेड या जिल्ह्यांतही पावसाचा अंदाज व्यक्‍त करण्यात आला आहे.

 
दरम्यान, शेतकऱ्यांनी काढणीस तयार असलेल्या हरभरा, करडई, रब्बी ज्वारी, गहू, भाजीपाला पिकांची; तसेच टरबूज, खरबूज पिकांची लवकर काढणी करावी. पिकाची सुरक्षित ठिकाणी साठवणूक करावी. मळणी केलेला माल सुरक्षित ठिकाणी साठवावा, असे आवाहन ग्रामीण कृषी मौसम सेवा केंद्राचे मुख्य प्रकल्प समन्वयक डॉ. के. के. डाखोरे यांनी केले आहे. अकोला, अमरावती, बुलढाणा, चंद्रपूर, नागपूर, वर्धा येथे रविवार आणि सोमवारी मेघगर्जनेसह हलक्या सरींची तुरळक ठिकाणी कोसळण्याची शक्यता आहे. तर भंडारा, गडचिरोली, गोंदिया, वाशिम, यवतमाळ येथेही मेघगर्जनेसह विजा आणि हलक्या पावसाची शक्यता आहे.

काळजी घेण्याचे आवाहन 

मागील तीन दिवसांपासून ढगाळ वातावरण आहे. या वातावरणाचा फळबागांना फटका बसला आहे. वादळी वाऱ्यासह पाऊस पडल्यास फळबागांचे अधिक नुकसान होणार आहे. आंब्याचा मोहर गळताना दिसून येत आहे. शिवाय, काढणीस आलेले फळ आणि बहाराचे नुकसान आहे. शेतकऱ्यांनी फळबागांच्या संरक्षणासाठी उपाययोजना करण्यास सुरुवात केली आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com