
छत्रपती संभाजीनगर - Chhatrapati Sambhajinagar
आठवडाभरापूर्वी राज्यातील अनेक भागात झालेल्या अवकाळी आणि गारपिटीने उभ्या पिकांची नासाडी केल्यानंतर या अवकाळीचे संकट पुन्हा मराठवाड्यावर (Marathwada) घोंगावू लागले आहे. हवामान खात्याने १५, १६ आणि १७ मार्च रोजी वादळी वारा आणि विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता वर्तविली आहे. आता होती नव्हती ती पिकेही हातून जाणार की काय अशा चिंतेने शेतकरी ग्रासला आहे.
वर्षांनुवर्षे दुष्काळाच्या झळा सहन करणाऱ्या मराठवाड्यावर चार वर्षांपासून वरुणराजा प्रसन्न झाला आहे. मात्र, अनेक वेळा या वरुणराजाने रौद्ररूप धारण केल्याने मराठवाड्यातील शेतकऱयांच्या अर्थकारणावरच घाला घातला जात आहे. गेल्यावर्षी दिवाळीदरम्यान अवकाळीने मराठवाड्याला झोडपून काढले होते. यामध्ये शेकडो एकर शेतातील उभ्या पिकांचे अक्षरशः खत झाले होते. त्यानंतर आर्थिक विवंचनेत असलेल्या शेतकऱ्यांनी पुन्हा कष्टाने शेती बहरवली होती.
अनेक भागांत गहू, हरभरा, उन्हाळी मका व बाजरी ही पिके काढणीला आली आहेत. काही दिवसांतच या पिकांतून शेतकर्यांना घामाचे दाम मिळणार होते. मात्र, अवकाळीने पुन्हा एकदा मराठवाड्यावर वक्रदृष्टी केली आणि रविवार व सोमवारी वादळी वाऱ्यासह गारांचा मारा करीत पिकांची नासाडी केली. डोळ्यांदेखत काढणीला आलेले पीक अवकाळीने आडवे केल्यामुळे शेतकऱ्यांना पुन्हा एकदा अवकाळीने सामना करावा लागणार आहे. आता पुन्हा चार दिवस मुसळधार पावसाच्या शक्यतेने चिंता वाढली आहे.