कुटुंबातील संवाद वाढविण्याची गरज

'सजग'चा सूर 
कुटुंबातील संवाद वाढविण्याची गरज

औरंगाबाद - aurangabad

हिसांचाराचे रूपांतर आता क्रूरतेकडे चालले आहे. महिला हिंसाचारात महिलांना संपवणे, कायमस्वरूपी त्यांचा आवाज बंद करणे याकडे गुन्हेगारांचा कल वाढत आहे. कुटुंबातील संवादात पडत चालले अंतर, विवेकवादाचा अभाव, संयम नसणे आणि कायद्यातील पळवाटा यामुळे  महिलांवर अत्याचार वाढत आहे. कुटुंबातील संवाद वाढवला, विश्वासाची नाते जोपासले तर हिंसक मनोवृत्तीला काहीअंशी आळा घालता येईल, असा सूर सजग महिला संघर्ष समितीच्या बैठकीत निघाला.

गेल्या काही दिवसांत महिलांवरील अत्याचारात भयंकर क्रूरता येत असल्याचे निदर्शनास येत आहे. पत्रकार सौरभ लाखे याने केलेला खून, कशिश या तरुणीची हत्या आदी घटनांच्या पार्श्वभूमीवर अनेकदा स्त्रीयांना दोषी ठरवले जाते, याबाबत निषेध व्यक्त करणे तसेच या घटनांना आळा कसा घालता येईल यासाठी बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. प्रारंभी ज्योती नांदेडकर यांनी विषयाची मांडणी केली. महिला अत्याचाराच्या राज्यातील घटनांचा आकडेवारीसह त्यांनी वेध घेतला. या विषयावर मीना खंडागळे, सुनीता जाधव, रजिया शेख, अॅड. ज्योती पत्की, पद्मा तापडिया, शंकुतला लोमटे, रुपाली बाविस्कर, डॉ. सरवदे, डॉ. मंजुषा शेरकर, अॅड. ज्योती देशपांडे यांनी आपली मते मांडली.

डॉ.रश्मी बोरीकर यांनी पालकत्व ही फक्त आईची जबाबदारी नसून कुटुंबाची आहे. कुटुंबातील संवाद कसा वाढेल यावर भाष्य केले. डॉ. स्मिता अवचार यांनी सामाजिक आदरयुक्त धाक वाढविण्याची गरज व्यक्त केली तर मंगल खिवंसरा यांनी प्रेमातून उद्भवणाऱ्या हिंसेला नकार हा कारणीभूत असून त्यात पुरुषत्वाची, मालकीची भावना निर्माण होते तेव्हा हिंसेचे क्रूर रुप समोर येते. पुरुषत्वाच्या भावनेपेक्षा मित्रत्व, सुखद सहवासाची भावना रुजवणे गरजेचे आहे, असे त्यांनी सांगितले.

अॅड. सुजाता पाठक यांनी गुन्हा सिद्ध करताना येणाऱ्या कायदेशीर अडचणीवर भाष्य केले. वैद्यकीय चाचणीत होणारा गलथानपणा, अपूर्ण माहिती, परीस्थितीजन्य पुराव्यांचा अभाव यामुळे आरोपी कसे सुटतात याबद्दल उपस्थितांना सांगितले. देशातील वेगवेगळ्या न्यायालयाकडून महिलांचे दुय्यमत्व अधोरेखित होते अशी विधाने येतात या प्रश्नांकडे डॉ. आरतीश्यामल जोशी यांनी लक्ष वेधले. या बैठकीस संगीता गुणारी, सरस्वती जाधव, लता जाधव, ज्योती गिरी, अनुराधा कोकणी, मीनाक्षी जाधव, डॉ. प्रगती अंबीरवाडीकर, सुहासिनी बोरीकर, डॉ. तृप्ती सरवदे, डॉ. रेणू चव्हाण यांची उपस्थिती होती.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com