छत्रपती संभाजीनगर - Chhatrapati Sambhajinagar
३५ वर्षांपासून औरंगाबादचे नाव संभाजीनगर व्हावे यासाठी प्रयत्न सुरू असतानाच राज्यात शिंदे-फडणवीस सरकार स्थापन होताच शहराचे व जिल्ह्याचे नाव छत्रपती संभाजीनगर असे नामांतर करण्यात आले. असे असले तरी कायदेशीर बाबी अद्याप पूर्ण झालेल्या नसल्याने जिल्हाधिकाऱ्यांनी शासकीय कामकाजात पूर्वीप्रमाणेच औरंगाबाद असा उल्लेख करण्याचे पत्र जारी केले आहे.
जिल्ह्याचे औरंगाबाद नाव बदलून छत्रपती संभाजीनगर करण्याचा निर्णय केंद्र शासनाने दोन महिन्यापूर्वी घेतला असून त्याबाबत अधिसूचना जारी केली आहे. केंद्र शासनाने घेतलेल्या निर्णयाविरोधात शहरातील काही सामाजिक संघटनांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठासह मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केल्या आहेत. उच्च न्यायालयाने दाखल याचिकांची तसेच जिल्ह्याच्या नामांतराला आलेल्या हरकतींची सुनावणी पूर्ण होईपर्यंत शासकीय कागदपत्रावरील औरंगाबाद नाव बदलू नये, असे सूचित केले आहे.
या सर्व पार्श्वभूमीवर छत्रपती संभाजीनगरचे जिल्हाधिकारी अस्तिककुमार पाण्डेय यांनी पत्र काढून जिल्ह्यातील सर्व शासकीय कार्यालय प्रमुखांना शासकीय कागदपत्रावरील औरंगाबाद नाव बदलू नका असे आदेश दिले आहेत. औरंगाबाद जिल्ह्याचे नाव बदलून छत्रपती संभाजीनगर आणि उस्मानाबादचे नाव बदलून धाराशिव करण्याचा निर्णय केंद्र व राज्य शासनाने दोन महिन्यापूर्वी घेतला असून त्याबाबत परिपत्रक जाहीर केले आहे.