
औरंगाबाद - aurangabad
यंदाचा उन्हाळा औरंगाबादकरांची चांगलीच परीक्षा (Examination) पाहत आहे. हवामान विभागानुसार (Meteorological Department) औरंगाबाद शहराच्या (Temperature) तापमानाच्या इतिहासामध्ये आतापर्यंत २६ एप्रिल १९५८ तसेच २९ एप्रिल २०१९ रोजी शहराचे कमाल तापमान ४३.६ अंश सेल्सियसपर्यंत पोचले होते. एप्रिल महिन्याच्या प्रारंभीपासूनच शहराच्या तापमानाने चाळिशी ओलांडली असून १८ एप्रिलपर्यंत ही चाळिशी कायम होती.
मार्च महिन्यातच तापमानाची चाळिशी पार केलेल्या औरंगाबाद शहरात एप्रिल महिन्यातही सूर्य कोपला असून, एप्रिल महिन्यात १७ पैकी तब्बल १५ दिवस शहराचे कमाल तापमान ४० अंशांच्या पार होते. केवळ १ एप्रिल आणि १६ एप्रिल या दोन दिवशी तापमान चाळिशीच्या आत होते. एप्रिल महिन्याच्या प्रारंभीपासूनच शहरात उन्हाचे चटके तीव्र स्वरूपात जाणवण्यास सुरुवात झाली होती, तर ८ एप्रिल रोजी शहरात मोसमातील उच्चांकी ४१.१ अंश सेल्सियस तापमानाची नोंद करण्यात आली होती. यानंतरही ९ व १० एप्रिल रोजी तापमान ४१ अंश सेल्सियस होते. या उच्चांकी तापमानानंतरही शहराचे कमाल तापमान सातत्याने चाळीस अंशाच्या पार असल्याने एप्रिल महिन्याचे दोन आठवडे नागरिकांना दिवसभर प्रचंड उकाड्याचा सामना करावा लागला.
१७ रोजी चिकलठाणा वेधशाळेत शहराचे किमान तापमान २४.२ अंश सेल्सिअस तर कमाल तापमानाची ४०.४ अंश अशी नोंद घेण्यात आली. गेल्या काही दिवसांपासून शहराच्या कमाल व किमान तापमानात सातत्याने वाढ होत असल्यामुळे सकाळपासूनच उन्हाची तीव्रता वाढण्यास सुरुवात होत आहे. दुपार होताच उन्हाचे चटके अधिक तीव्र होत असून संध्याकाळी ऊन कमी झाले तरी वातावरणात उकाडा कायम राहत आहे.