'वर्क फ्रॉम होम'चे आमिष पडले दीड लाखात!

चक्क पोलीस अधिकाऱ्याला गंडा
'वर्क फ्रॉम होम'चे आमिष पडले दीड लाखात!

औरंगाबाद - Aurangabad

सहायक पोलीस निरीक्षकाच्या (API) मुलाने वडिलांच्या ट्विटर (Twitter) खात्यावर वर्क फ्रॉम होमची (Work from home) जाहिरात पाहून भामट्याशी साधलेल्या संपर्कातून त्याने दीड लाखांना गंडविल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. हा प्रकार 15 ते 22 जून या काळात घडला. अमित राय असे भामट्याचे नाव आहे. सहायक पोलीस निरीक्षकांच्या पत्नीने दिलेल्या तक्रारीवरून सिडको पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शहर पोलीस दलातील सहायक पोलीस निरीक्षक प्रशांत बोंडेकर यांच्या पत्नी सुकन्या (36, रा. एन-8, राणाजी हॉल जवळ, टिव्ही सेंटर, हडको) यांनी दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, इयत्ता दहावीत शिकणार्‍या त्यांच्या मुलाचे ऑनलाईन क्लासेस सुरु आहेत. त्यासाठी तो प्रशांत यांचा मोबाइल वापरत होता. 26 जून रोजी त्याने सुकन्या यांना सांगितले की, त्याने 15 जून रोजी प्रशांत यांच्या मोबाइलवर त्यांचे व्टिटर खाते वापरत होता. त्यावेळी त्याला वर्क फ्रॉम होमची एक जाहिरात दिसली. त्यातील चॅट बॉक्समध्ये मुलाने वर्क फ्रॉम होमसाठी नोंदणी करायची आहे. असा मेसेज पाठवताच त्या मेसेजला लगेचच भामट्याचे उत्तर आले. त्यात भामट्याने एक व्हॉटस्अप क्रमांक पाठवला. तसेच त्यावर मॅसेज करायला सांगितला. त्यामुळे मुलाने भामट्याच्या मोबाइलवर मॅसेज पाठवला.

भामट्याने सांगितले, तुम्हाला जर वर्क फ्रॉम होम करायचे असेल, तर आम्ही तुम्हाला एक लिंक पाठवू त्या लिंकवर प्रत्येक क्लिक करता 120 ते 150 रुपये मिळतील. या कामासाठी जॉईन होण्यासाठी अगोदर 999 रुपये भरावे लागतील असेही भामटा म्हणाला. तसेच पैसे भरण्याकरीता व्टिटरवर एक क्रमांक पाठवू असा मेसेज केला. त्यानंतर प्रशांत यांच्या व्टिटरवर भामट्याने अमित राय नावाने असलेल्या एसबीआय बँकेचा(SBI Bank) खाते क्रमांक पाठविला.

प्रशांत यांच्या पेटीएमचा (Paytm) यूपीआय आयडीचा पासवर्ड मुलाला माहिती असल्याने त्याने पेटीएममधून भामट्याने दिलेल्या बँक खात्यावर सुरुवातीला 999 रुपये पाठविले. त्यावर भामट्याचा पुन्हा व्हॉटस्अपवर मेसेज आला. त्यात त्याने तुमचे रजिस्ट्रेशन झाले असून, सुरक्षा ठेवीकरिता चार हजार 999 रुपये भरावे लागतील असे सांगितले. त्यामुळे मुलाने पुन्हा पेटीएमद्वारे पैसे पाठविले. पुढे 16 जून रोजी पुन्हा भामट्याने व्हॉटस्अप मॅसेज पाठवला. त्यात तुमची सुरक्षा ठेप प्राप्त झाली असून, तुम्हाला पॅकेज खरेदी करावे लागेल. त्याकरिता यूपीआय आयडीवर सहा हजार 300 रुपये व दोन हजार 699 असे एकूण आठ हजार 999 रुपये पाठवावे लागतील असे सांगितले.

त्यावेळी भामट्याने व्टिटरवर गुगल पे आयडी हा प्रवीणकुमार सिंग या नावाने पाठविला. त्या आयडीवर मुलाने 17 जून रोजी पेटीएमद्वारे पैसे पाठविले. मात्र, पुन्हा 18 जून रोजी भामट्याने अ‍ॅप व लिंक तयार करण्यासाठी पुन्हा 25 हजार रुपये, 19 जून रोजी भरलेले पैसे रिफंड कार्ड खरेदीसाठी 40 हजार रुपये भामट्याने अंशुदास या एसबीआयच्या खात्यावर पैसे मागविले. ते सुध्दा प्रशांत यांच्या मुलाने पाठविले. मात्र, अद्याप लिंक न आल्याने मुलाने 20 जून रोजी भामट्याच्या मोबाइलवर संपर्क साधत वर्क फ्रॉम होमसाठी लिंक उपलब्ध झाली नसल्याचे सांगितले.

तेव्हा भामट्याने तुम्हाला भरलेल्या पैशाचा रिफंड मिळेल व सर्व प्रक्रियेसाठी एक ते दोन दिवस लागतील असे सांगितले. परंतू भामट्याने पुन्हा 21 जून रोजी व्हाटस्अपवर मॅसेज करून सर्वप्रकियेसाठी उशीर झाल्याने तुमची लिंक फेल झाल्याचे म्हणाला. तुम्हाला पुन्हा सर्व प्रक्रिया करावी लागेल. तसेच भरलेले सर्व पैसे रिफंड मिळतील अशी थाप मारून 22 जून रोजी दोन टप्प्यात 80 हजार रुपये पुन्हा उकळले. अशाप्रकारे भामट्याने सहायक पोलीस निरीक्षकाची एक लाख 59 हजार 997 रुपयांची फसवणूक केली.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com