दहा कोटींच्या कर्जाचे आमिष ; ११ लाख गमावले

डॉक्टरची फसवणूक
दहा कोटींच्या कर्जाचे आमिष ; ११ लाख गमावले
Sandip Tirthpurikar

छत्रपती संभाजीनगर - Chhatrapati Sambhajinagar


पाच टक्के व्याजदराने बँकेकडून (bank) दहा कोटी रुपयांपर्यंत कर्ज मिळवून देतो, अशी थाप मारून एका डॉक्टरला (Doctor) आरोपीने अकरा लाख रुपयांचा गंडा (fraud) घातल्याचा प्रकार समोर आला आहे. तीन डिसेंबर २०२१ ते २१ नोव्हेंबर २०२२ या कालावधीत ही फसवणुकीची घटना घडली. याप्रकरणी तक्रारीवरून क्रांती चौक पोलिस (police) ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. 

डॉ.सुनील अशोकराव साळुंके (वय ३२, रा. छत्रपतीनगर) असे फिर्यादीचे नाव आहे. तर गजानन अरविंद कुलकर्णी (रा.छत्रपती संभाजीनगर) असे डॉक्टरला ११ लाख रुपयांचा गंडा घालणार्‍या भामट्याचे नाव आहे. डॉ.सुनील साळुंके हे शहरातील एका खासगी हॉस्पिटलमध्ये चिकित्सक म्हणून कार्यरत आहेत. त्यांना स्वतःचे हॉस्पिटल सुरू करायचे असल्याने त्यांना १० कोटी रुपयांची आवश्यकता होती. दरम्यान, डॉ.सुनील साळुंके यांनी पैशाबाबत त्यांचा मित्र जयेश
पाचा याच्यासोबत चर्चा केली. त्यावेळी जयेश कुलकर्णी यांनी त्यांच्या ओळखीतील गजानन कुलकर्णी हा एजंट असून तो मदत करू शकतो, असे सांगितले. त्यानंतर डॉ.साळुंके यांनी गजानन कुलकर्णी यांच्याशी संपर्क साधला असता त्याने डॉ.साळुंके यांच्या कागदपत्रांची पाहणी करीत पाच टक्के व्याजदराने दहा कोटी रुपयांचे कर्ज मिळवून देतो. त्यासाठी कमीशन म्हणून चार टक्के रक्‍कम द्यावी असे सांगितले.

दरम्यान, गजानन कुलकर्णी याने डॉ. साळुंके यांच्याकडून वेळोवेळी करून ११ लाख घेतले होते, तसेच त्याबाबत लेखी करार केला होता. कराराची मुदत संपल्यावरही कर्ज मंजूर न झाल्याने डॉ.साळुंके यांनी गजानन कुलकर्णी याच्याशी संपर्क केला असता त्याने उडवा-उडवीची उत्तरे देण्यास सुरुवात केली. तसेच गजानन कुलकर्णी यांनी दिलेला ११ लाख रुपयांचा चेकदेखील वटला नव्हता. याप्रकरणी डॉ. साळुंके यांच्या तक्रारीवरून गजानन कुलकर्णी याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलिस निरीक्षक संतोष पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक निरीक्षक पुजारी करीत आहेत.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com