रस्त्यांचे भाग्य उजळणार-शंभर कोटीचा निधी

रस्त्यांचे भाग्य उजळणार-शंभर कोटीचा निधी

औरंगाबाद - aurangabad

महापालिका (Municipality) फंडातून शहरात दोनशे कोटी रुपये खर्च करून रस्त्यांची कामे केली जाणार आहेत. त्यापैकी पहिल्या टप्प्यात शंभर कोटी रुपये खर्च करून रस्त्यांची कामे केली जाणार आहे. या कामांची निविदा महिनाभरात प्रसिद्ध केली जाणार आहे. त्यानंतर पुढील सहा महिन्यात ही कामे होणार आहेत. 

औरंगाबाद शहरात शासकीय निधीतून मोठ्या प्रमाणावर रस्त्यांची कामे करण्यात आली आहे. प्रामुख्याने मुख्य रस्त्यांच्या कामांचा समावेश यात करण्यात आला. बहुतेक रस्त्यांचे काँक्रिटीकरण करण्यात आले. महापालिकेच्या फंडातून देखील रस्त्यांची कामे करण्याची भूमिका मांडण्यात आली. त्यानुसार अर्थसंकल्पात रस्त्यांच्या कामांसाठी दोनशे कोटींची तरतूद देखील करण्यात आली. दोनशे कोटींपैकी पहिल्या टप्प्यात शंभर कोटींची कामे करण्याचा निर्णय घेण्यात आला. शंभर कोटींमध्ये ८१ रस्त्यांची कामे केली जातील असे जाहीर करण्यात आले. ही सर्व कामे प्रामुख्याने अंतर्गत रस्त्यांची आहेत. ज्या ८१ रस्त्यांची कामे करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यापैकी १६ रस्त्यांची कामे आमदार – खासदार निधीतून करण्यात आल्याचे स्पष्ट झाले, त्यामुळे या रस्त्यांची कामे वगळण्यात आली. उर्वरित रस्त्यांसाठी निविदा प्रक्रिया सुरू करण्यात आली; परंतु पालिकेचे नवनियुक्त प्रशासक तथा आयुक्त (Commissioner) डॉ. अभिजित चौधरी यांनी ही प्रक्रिया थांबवली.


निधीची उपलब्धता आणि ज्या रस्त्यांची कामे केली जाणार आहेत त्या रस्त्यांबद्दलचा अहवाल याचा आढावा घेण्याचा निर्णय त्यांनी घेतला. त्यानुसार त्यांना अहवाल प्राप्त झाला असून निधीची उपलब्धता होऊ शकते असे लक्षात आल्यावर त्यांनी निविदा काढण्यास परवानगी दिली आहे. महिनाभरात निविदा प्रसिध्द होतील असे त्यांनी सांगितले. शंभर कोटींच्या रस्त्यांची विभागणी चार टप्प्यात करण्यात आली आहे. निविदा देखील काढल्या जाणार आहेत. निविदा प्रक्रिया पूर्ण झाल्यावर पुढील सहा महिन्यात रस्त्यांची कामे पूर्ण होतील. 

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com