Wednesday, April 24, 2024
HomeUncategorizedआता वीज मीटर होणार आपोआप नावावर!

आता वीज मीटर होणार आपोआप नावावर!

औरंगाबाद – aurangabad

आता घर किंवा दुकान खरेदी केल्यानंतर तेथील वीज मीटर (Electricity meter) नावावर करून घेण्यासाठी महावितरणच्या कार्यालयात खेट्या मारव्या लागणार नाहीत. ‘इज ऑफ लिव्हिंग’च्या अंतर्गत सुरू केलेल्या उपक्रमात आता वीजमीटर आपोआप नावावर होणार आहे. महावितरणने माहिती तंत्रज्ञानाचा (Information Technology) वापर करून नवीन व्यवस्था नुकतीच सुरू केली आहे.

- Advertisement -

वापरातील जुन्या मालमत्तांच्या खरेदी-विक्रीचे व्यवहार मोठ्या प्रमाणात होत असतात. या व्यवहारात घर किंवा दुकान घेतल्यानंतर तेथील वीज मीटर नावावर करून घेण्यासाठी संबंधित व्यक्‍तीला महावितरणच्या कार्यालयात खेट्या माराव्या लागत होत्या. दरम्यान, ग्राहक सेवा असल्याने अखेर महावितरणने वीज मीटर नावावर करून घेण्यासाठी ऑनलाईन सुविधाही उपलब्ध केली होती. मात्र, त्यानंतर वीज मीटर नावावर करण्यासाठी पाठपुरावा, प्रसंगी चिरीमिरी द्यावी लागत होती. या कटकटीतून मालमत्ता खरेदी करणाऱ्या सर्वसामान्यांची सुटका होणार आहे. महावितरणने आता स्वतःहून वीज मीटर मालमत्ता खरेदी करणाऱ्याच्या नावावर करण्याचा उपक्रम सुरू केला आहे.

नव्या व्यवस्थेनुसार मुद्रांक शुल्क व नोंदणी विभागाशी महावितरणची आयटी सिस्टीम जोडण्यात आली आहे. नोंदणी विभागात नव्या मालकाच्या नावाची प्रक्रिया पूर्ण झाली की, महावितरणला संदेश पाठविला जातो. त्यानुसार महावितरणकडून संबंधित ग्राहकांना एसएमएस पाठवला जातो. आवश्यक प्रक्रिया शुल्क भरण्यास संबंधितास कळविले जाते. हे शुल्क भरणा करण्यासाठी ऑनलाईन सुविधाही उपलब्ध आहे. शुल्क भरणा होताच वीज मीटर नावावर करण्याची प्रक्रिया पूर्ण होते आणि त्यानंतरचे नवीन वीज बिल नवीन मालमत्ताधारकांच्या नावावर येते. या व्यवस्थेची महावितरणकडून नुकतीच चाचणी घेण्यात आली असून ती यशस्वी झाली आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या