झोपड्यांमधील चिमुकल्यांनी घेतला ‘पिझ्झा’चा आस्वाद!

बालदिनानिमित्त पार्टीचे आयोजन
झोपड्यांमधील चिमुकल्यांनी घेतला ‘पिझ्झा’चा आस्वाद!

रंगाबाद- Aurangabad

चकाचक दालनाच्या काचेआड बसलेल्या श्रीमंतांना पिझ्झा खाताना न्याहाळणाऱ्या गरीब, कष्टकरी कुटुंबातील मुलांचे प्रत्यक्ष पिझ्झा-बर्गर खाण्याचे स्वप्न रविवारी प्रत्यक्षात पूर्ण झाले. आस्था जनविकास संस्थेच्या अनोख्या उपक्रमाने या मुलामुलींचा बालदिन खऱ्याअर्थी साजरा झाला.   

शहराच्या वेगवेगळ्या भागात रस्त्याच्या कडेला झोपड्या करून राहणाऱ्या कुटुंबातील १५० मुलांनी चक्क नामांकित स्टोअरमध्ये बसून पसंतीचा पिझ्झा ऑर्डर केला. कोल्ड्रिंक्ससोबत वेगवेगळ्या चवीच्या चिझ, ओनियन, टोमॅटो, चिली आणि पनीर पिझ्झाचा मनसोक्त आस्वाद घेतला. त्यानंतर मराठमोळा वडापाव व आईस्क्रीमवर ताव मारत बालदिनाची जंगी पार्टी  साजरी केली. आस्था जनविकास संस्थेच्या वतीने बालदिनाच्या पूर्वसंध्येला रविवारी (१३ नोव्हेंबर) हे आयोजन करण्यात आले. शहराच्या चारही बाजूला स्थलांतरित कुटुंब झोपड्या करून राहतात. मिळेल ते काम करतात. हातात तोकडे पैसे असल्याने गरिबीत दिवस काढतात.  
ब्रँडेड स्टोअरमध्ये मिळणाऱ्या पिझ्झा, बर्गर, पास्ताची या मुलांनाही भुरळ पडते. परंतु, काचेतूनच न्याहाळण्याशिवाय पर्याय नसतो. त्यांना प्रत्यक्षात हा आनंद देण्यासाठी आस्थातर्फे त्यांना नामांकित स्टोअरमध्ये पिझ्झा पार्टी देण्यात आली. मुलांनी पिझ्झासोबत गार्लिक ब्रेड आणि विविध पदार्थांचा आस्वाद घेतला. धम्माल मज्जा करताना मुलांनी विविध कलागुण देखील सादर केले. पिझ्झानंतर वडापाव, आईस्क्रीम खाण्याची इच्छाही पूर्ण करण्यात आली. १८ मुले अनवानी पायाने आल्याने त्यांना नव्या चपला देण्यात आल्या. बीड बायपास, सेव्हन हिल्स, जळगाव टी-पॉईंट आणि मुकुंदवाडी येथील मुले उपक्रमात सहभागी झाले. काहींना त्यांच्या झोपड्यांमध्ये पिझ्झाचे पार्सल देण्यात आले.

उपक्रम यशस्वी करण्यासाठी ‘आस्था’च्या अध्यक्षा डॉ. आरतीश्यामल जोशी, डॉ. मथुरा मेवाड, अक्षय कोडीलकर, शशांक तांबोळी, आकाश देशमुख, मंजुषा माळवदकर, अनुराधा कामत, विजय रणदिवे, रवींद्र पाटणकर, मधू ठाकूर, गीता जोशी, अभिजीत बागूल, जयप्रकाश जोशी, ज्योती करमासे, पत्रकार मकरंद कुलकर्णी, लीना जोशी, सारिका भंडारी, अविनाश खांबेकर, आनंद भगेरीया, अंजू मुळे, संंपदा पोफळे, वैशाली सदगुणे, रुपाली कुलकर्णी, सरीता लोणीकर, राजनंदिनी जाधव, अर्चना देवगिरीकर यांनी सहकार्य केले.

पिझ्झा नको, नूडल्स द्या
पहिल्यांदाच पिझ्झा खाणाऱ्या काही मुलांनी तो आवडला नसल्याची तक्रार केली. त्यातून तारा निघतात. पिझ्झा नको नुडल्स द्या, अशी मागणी त्यांनी केली. नूडल्ससोबत इतर खाऊ देऊन मुलांचे समाधान करण्यात आले.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com