Friday, April 26, 2024
HomeUncategorizedसाड्या विकणाऱ्या मुलीवर अत्याचार ; आरोपीला सक्तमजुरी

साड्या विकणाऱ्या मुलीवर अत्याचार ; आरोपीला सक्तमजुरी

औरंगाबाद – aurangabad

साडी विक्री करणाऱ्या १४ वर्षीय मुलीला दुचाकीवर पळवून नेत तिच्यावर लैंगिक अत्याचार करणाऱ्या ओमप्रकाश जियालाल जैस्वाल (४०, रा. वरठाण, ता. सोयगाव) यास ७ वर्षे सक्तमजुरी आणि ३० हजारांची दंडाची शिक्षा जिल्हा व सत्र न्यायाधीश एस. के. कुलकर्णी यांनी ठोठावली.

- Advertisement -

याप्रकरणी पीडित मुलीच्या पित्याने पिशोर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली होती. फिर्यादी व त्याचे कुटुंबीय मध्य प्रदेशातून औरंगाबाद जिल्ह्यातील एका गावात ३० नोव्हेंबर २०१० पासून स्थायिक झाले होते. ते आजूबाजूच्या गावांत जाऊन साडी विक्रीचा व्यवसाय करत. १ डिसेंबर २०१० रोजी फिर्यादीची मुलगी मावशीसोबत साडी विक्रीसाठी गेली होती. तेथे आरोपी जैस्वाल व त्याचा मित्र आला. त्यांनी मुलीला दुचाकीवर बसवून वरठाणच्या दिशेने नेले. त्या वेळी मुलीने मदतीची याचना केली, पण कोणीच धावून आले नाही. मुलीने दुचाकीवरून उडी मारण्याचा प्रयत्न केला असता आरोपीने धमकावून तिच्यावर अत्याचार केला. दरम्यान, फिर्यादीकडून आरोपींचा शोध सुरू झाल्याची व आरोपींना इशारा दिल्याची माहिती मित्राने फोनवरून दिल्यानंतर जैस्वाल तिला घेऊन पुन्हा पळाला. त्या वेळी पोलिसांनी त्याला अडवून अटक केली.

पोलिस उपनिरीक्षक सदाशिव चौधरी यांनी न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले, तर पैरवी अधिकारी म्हणून जमादार पठाण, ढेरे यांनी काम पाहिले. सहायक लोकाभियोक्ता कैलास पवार यांनी १२ साक्षीदारांचे जबाब नोंदवले. यातील दोन साक्षीदार फितूर झाले. या प्रकरणात दोन्ही बाजूंच्या युक्तिवादानंतर व साक्ष-पुराव्यांवरून न्यायालयाने आरोपीला दोषी ठरवून कलम ३६६ (अ) अन्वये पाच वर्षे सक्तमजुरी व १० हजार रुपये दंड व दंड न भरल्यास सहा महिने अतिरिक्त सक्तमजुरी, तर कलम ३७६ कलमान्वये ७ वर्षे सक्तमजुरी व २० हजार रुपये दंड व दंड न भरल्यास एक वर्ष सक्तमजुरीची शिक्षा ठोठावली.

- Advertisment -

ताज्या बातम्या