मर्यादेबाहेर आवाज करणाऱ्या फटाक्यांची चाचणी

प्रदूषण नियंत्रण मंडळाचा उपक्रम
मर्यादेबाहेर आवाज करणाऱ्या फटाक्यांची चाचणी

औरंगाबाद- Aurangabad

दिवाळीच्या सणासाठी बाजारात दाखल झालेल्या फटाक्यांच्या (firecrackers) आवाजाची महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण (Pollution control) मंडळाने गुरूवारी चाचणी घेतली. नियमापेक्षा अधिक आवाज करणारे फटाके ध्वनी प्रदूषण करतात. चाचण्यांचे विश्लेषण केल्यावर आवाजाची मर्यादा ओलांडणाऱ्या फटाक्यांची ओळख पटवून त्यावर बंदी घातली जाईल.

प्रदूषण नियंत्रण ((Pollution control)) मंडळाच्यावतीने दरवर्षी ध्वनी प्रदूषण करणाऱ्या फटाक्यांची चाचणी घेतली जातेे. गुरूवारी चिकलठाणा एमआयडीसीतील झालानी टूल्स कंपनीच्या मैदानात चाचण्या घेण्यात आल्या. यावेळी मंडळाचे उपप्रादेशिक अधिकारी प्रदीप वानखेडे, एमआयडीसीचे गिरी, महाबळ एन्वायरोचे अविनाश बाळंक, मंडळाचे क्षेत्रीय अधिकारी डॉ. राजेश औटी, दीपक बनसोड, रविंद्र जाधव, सीमा मांगूळकर, प्रा.रेखा तिवारी तसेच तज्ञ म्हणून डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या पर्यावरण शास्त्र विभागाचे प्रा. डॉ. सतीश पाटील आणि एन्वायरोनमेंटल रिसर्च फाऊंडेशन अॅण्ड एज्युकेशन अॅकडमीचे अध्यक्ष दिलीप यार्दी यांची उपस्थिती होती.

२८ प्रकारच्या फटाक्यांची खरेदी

चाचण्यासाठी मंडळाचे कर्मचाऱ्यांनी बाजारातून एका प्रकारातील किमान ३ ब्रँडचे फटाके आणले. एकूण २८ प्रकारचे फटाके आणण्यात आले. चाचणीसाठी मैदानावर ८ मीटर व्यासाचे गोल आखण्यात आले. याच्या मधोमध ठेवलेल्या फर्शीवर फटाके फोडले गेले. दोन अधिकाऱ्यांनी नॉइस लेव्हल मिटरद्वारे आवाज नोंदवून घेतले.

...तर फटाक्यांवर बंदी

चाचण्यांचे विश्लेषण करून मर्यादेबाहेर आवाज असणाऱ्या फटाक्यांची यादी तयार केली जाईल. ती मंडळाचे मुख्यालय तसेच केंद्रिय प्रदूषण नियंत्रण मंडळाला पाठवून त्या फटाक्यांच्या विक्रीवर बंदी आणली जाईल. बहुतांशी कंपन्या ध्वनीप्रदूषणाची मर्यादा पाळतात. त्या पाकीटावर याची नोंदही करतात, अशी माहिती प्रदीप वानखेडे यांनी दिली.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com