लसीकरण वाढविण्यासाठी धर्मगुरूंनी पुढाकार घ्यावा-जिल्हाधिकारी सुनील चव्हाण

लसीकरण वाढविण्यासाठी धर्मगुरूंनी पुढाकार घ्यावा-जिल्हाधिकारी सुनील चव्हाण

औरंगाबाद - aurangabad

कोरोना प्रतिबंधात्मक लस (Corona vaccine) सर्व नागरिकांनी घेणे अत्यावश्यक आहे. यासाठी सर्व धर्म गुरूंनी कोरोना प्रतिबंधात्मक लस घेण्यासाठी नागरिकांचे प्रबोधन करावे. जिल्ह्यातील अधिकाधिक नागरिकांचे लसीकरण करण्यासाठी त्यांनी पुढाकार घेण्याचे आवाहन जिल्हाधिकारी सुनील चव्हाण (Collector Sunil Chavan) यांनी केले.

जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली जिल्ह्यातील धर्मगुरूंची बैठक पार पडली. यावेळी ते बोलत होते. बैठकीस इंजि. वाजेद कादरी, युसूफ अन्सारी, इक्बाल अहमद अन्सारी, फा. स्टीफन अलमेडा, हाफिज, उपजिल्हाधिकारी प्रभोदय मुळे, मनपा आरोग्य अधिकारी डॉ.पारस मंडलेचा, डॉ.लड्डा, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सुधाकर शेळके, डॉ.वाघ आदींची उपस्थिती होती.

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी नुकतीच व्हीसीद्वारे औरंगाबाद जागतिक पातळीवरील पर्यटनस्थळ आहे, याठिकाणी लसीकरण अधिक वाढविण्यासाठी निर्देश दिले आहेत. त्यासाठी जिल्ह्यातील सर्वांचे सहकार्य अत्यावश्यक आहे. चीन, रशियात कोरोनाची तिसरी लाट आली आहे. तशी जिल्ह्यात येऊ नये. जिल्ह्याचे आरोग्य उत्तम रहावे, यासाठी सर्वांनी सर्वांना लसीकरण करून घ्यावे, यासाठी प्रोत्साहित करावे, असे आवाहनही चव्हाण यांनी धर्मगुरू यांना केले. नागरिकांना सोयीचे होईल या दृष्टीने दवाखान्याची वेळ निश्चित करावी. हेल्पलाईन तयार करावी, तसेच जिल्हयातील निवडक अशा ठिकाणी चोवीस तास लसीकरण केंद्रे तयार ठेवावीत, असे निर्देश आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांना केले.

धर्मगुरूंनी केल्या सूचना

शाळेतील पाल्य, त्यांचे पालक यांना लसीकरणाचे महत्त्व पटवून देणे आवश्यक आहे. जनजागृती, शिबिरे, कॉर्नर बैठका, प्रेरणादायी व्याख्याने, दवाखान्याची वेळ निश्चित करणे, फिरते वाहनाद्वारे जनजागरण, वकील, डॉक्टर, स्वयंसेवी संस्था, मंगल कार्यालये आदींनी लसीकरणासाठी आग्रही असणे आवश्यक असल्याच्या सूचना धर्मगुरूंनी प्रशासनाला केल्या. तसेच सर्वांकडून प्रशासनाला मदत करण्यात येईल, असेही सांगितले.

या गावांना केले आवाहन

लासूर, सिद्धनाथ वडगाव प्राथमिक आरोग्य केंद्र, वडगाव, गेवराई तांडा, नायगाव, बकापूर, पीरवाडी, बनगाव, ओव्हर, माहुली, रावळसपुरा, मिकापूर, काद्राबाद, वरुडकाजी, अंजनडोह या गावात लसीकरण कमी झाल्याने या ठिकाणीही नागरिकांनी लस घ्यावी, असे आवाहन चव्हाण यांनी केले.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com