नवरात्रोत्सव साजरा करताना अशी घ्या काळजी..!

जाणून घ्या काय आहेत नियम
नवरात्रोत्सव साजरा करताना अशी घ्या काळजी..!

औरंगाबाद - Aurangabad

राज्यात ७ ते १५ ऑक्टोबर दरम्यान (Navratri festival) नवरात्रोत्सव साजरा होत आहे.  याबाबतच्या मार्गदर्शक सूचना (State Government) राज्य सरकारने जारी केल्या आहेत. त्यानुसार हा उत्सव नागरिकांनी साजरा करावयाचा आहे.

यंदाच्या नवरात्रोत्सवातही नागरिकांना कोरोना नियमांचे पालन करावे लागणार आहे. याबाबत राज्य सरकारने नेमक्या काय सूचना दिल्या आहेत, याबाबत जाणून घेऊ या...

काय असतील नियम?

मंडपासाठी परवानगी आवश्यक

सार्वजनिक नवरात्रोत्सवासाठी मंडळांना स्थानिक प्रशासनाची पूर्वपरवानगी घ्यावी लागेल. स्थानिक प्रशासनाच्या धोरणानुसार मंडप उभारावेत. साध्या पध्दतीने घरगुती, तसेच सार्वजनिक देवीच्या मूर्तीची सजावट करावी.

देवीची मूर्ती

सार्वजनिक मंडळातील मूर्ती चार तसेच घरगुती देवीची मूर्ती दोन फुटांची असणे बंधनकारक आहे, तसेच मूर्ती शाडूची आणि पर्यावरणपूरक असणे आवश्यक आहे, शक्यतो घरातील धातू, संगमरवर मूर्तीचे पूजन करावे. मूर्ती शाडूची असल्यास घरीच विसर्जन करावे.

गरबा, दांडियावर बंदी

गरबा, दांडियासह इतर सांस्कृतिक कार्यक्रमांवर बंदी घालण्यात आली आहे. त्याऐवजी आरोग्य शिबिरे घ्यावेत. साथीच्या आजाराबाबत प्रतिबंधात्मक उपाय करावेत.

जनजागृतीवर भर

आरोग्य विषयक व सामाजिक संदेश देणाऱ्या जाहिराती प्रदर्शित कराव्यात. 'माझे कुटुंब, माझी जबाबदारी' मोहिमेबाबत जनजागृती करावी. स्वेच्छेने दिलेल्या देणगीचा स्वीकार करावा.

गर्दी नकोच

आरती, भजन, कीर्तन वा धार्मिक कार्यक्रमाच्या वेळी मंडपात गर्दी होऊ देऊ नये. ध्वनी प्रदूषणाच्या नियमांचे पालन करावे. मंडपात एका वेळी ५ पेक्षा जास्त लोक नसावेत.

ऑनलाईन दर्शन

देवीच्या दर्शनाची सुविधा ऑनलाईन, केबल नेटवर्क, वेबसाईट व फेसबुक आदींद्वारे करावी. मंडपांत प्रत्यक्ष देवीच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना कोरोना नियमांचे पालन करावे.

मिरवणुकीला परवानगी नाही

देवीचे आगमन व विसर्जन मिरवणुका काढता येणार नाहीत. विसर्जन स्थळी कमीत कमी वेळ थांबावे. लहान मुले, वृद्धांना विसर्जनस्थळी नेऊ नये. संपूर्ण चाळीतील मुर्तीची एकत्र विसर्जन मिरवणूक काढता येणार नाही.

रावण दहन

दसऱ्याच्या दिवशी रावण दहन करता येईल, पण त्यासाठी कमीत कमी लोक असावेत. समाज माध्यमातून त्याचे थेट प्रक्षेपण करावे.

Related Stories

No stories found.