मान्सुनच्या पार्श्वभूमीवर यंत्रणांनी सज्ज राहावे-विभागीय आयुक्त

मान्सुनच्या पार्श्वभूमीवर यंत्रणांनी सज्ज राहावे-विभागीय आयुक्त

औरंगाबाद - aurangabad

मान्सुन काळात उद्भवणाऱ्या नैसर्गिक आपत्तीला तोंड देण्यासाठी सर्व यंत्रणांनी आवश्यक त्या उपाययोजनांची तयारी पूर्ण करुन घ्यावी. जिवीत व वित्त हानी टाळण्याकरीता क्षेत्रीय सर्वेक्षण करुन यंत्रणा सज्ज ठेवावी. यासाठी सुक्ष्म नियोजन करावे, अशी सूचना विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर (Divisional Commissioner Sunil Kendrakar) यांनी केली.

विभागीय आयुक्त कार्यालयाच्या सभागृहात आज मान्सुनपूर्व तयारी बाबत केंद्रेकर यांच्या अध्यक्षतेखाली बैठक पार पडली. यावेळी (Collector Sunil Chavan) जिल्हाधिकारी सुनील चव्हाण, (Chief Executive of Zilla Parishad) जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी नीलेश गटणे, महानगर पालिकेचे प्रशासक अस्तिककुमार पाण्डेय, तर व्हीडीओ कॉन्फरसिंगच्या माध्यमातून मराठवाडा विभागातील सर्व जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी, पोलीस अधीक्षक, व संबंधित यंत्रणेचे अधिकारी बैठकीस उपस्थित होते.

पावसाळ्याच्या काळात अचानक उद्भवणाऱ्या नैसर्गिक आपत्तीला तोंड देण्यासाठी जिल्हा प्रशासन व पोलीस यंत्रणेने विशेष दक्षता घेणे आवश्यक असल्याचे सांगून केंद्रेकर म्हणाले की, संबंधित सर्व यंत्रणांनी परस्परांशी समन्वय ठेवावा. याशिवाय महानगर पालिका, नगरपालिका, सार्वजनिक बांधकाम विभाग, जलसंपदा, महावितरण, महापारेषण, आरोग्य विभाग, पशुसंवर्धन, परिवहन विभागाने अधिक दक्ष राहावे. पावसाळ्यात प्रामुख्याने नदीकाठच्या गावांबाबत विशेष खबरदारी घेणे आवश्यक आहे. गोदावरी काठच्या गावांबाबत प्राधान्याने सतर्क राहावे. छोटे नाले, ओढे, नद्या, यांना अचानक येणाऱ्या पुराच्यावेळी दुर्घटना घडू नये यासाठी दक्षता घ्यावी. ज्या गावांमध्ये, वसाहतींमध्ये अतिपर्जन्याची शक्यता आहे तसेच गेल्या वर्षात ज्या ज्या ठिकाणी जास्त पाऊस झाला आहे, अशा सर्व ठिकाणी स्थलांतराची पर्यायी व्यवस्था, शाळा, समाज मंदिर, इतर सुरक्षित ठिकाणे तयार ठेवावीत. त्या जागी औषधी, पाणी, जेवणाची व्यवस्था राहिल याची खबरदारी घेण्याची सूचना करण्यात आली.

सार्वजनिक बांधकाम विभागाने छोटे-मोठे पुलांचे सर्वेक्षण करुन त्यांची दुरूस्ती करुन घ्यावी. जिल्हा परिषदेने सर्व तलाव, पाझर तलाव, नद्या काठावरची गावे यांची प्रत्यक्ष पाहणी करुन संरक्षणाचे उपाय योजावेत. ज्या ठिकाणी तलाव, धरणाच्या भिंती, दरवाजे, इतर बाबींची दुरूस्ती करणे गरजेचे आहे त्या ठिकाणी तातडीने दुरूस्ती कामे पूर्ण करावीत. धरणे, पाझर तलाव या ठिकाणी चोवीस तास देखरेख यंत्रणा तयार ठेवावी. पूरप्रणव क्षेत्र-गावे याबाबत लाल व निळ्या गावांबाबत माहिती घेऊन संबंधित यंत्रणेसह सतर्क राहावे. नदीपात्रात अतिक्रमणे असल्यास तात्काळ काढण्यात यावीत.

हवामान खात्याच्या संपर्कात राहून दक्षतेचे इशारे, सुरक्षेचे उपाययोजना म्हणून वेळेत सर्व यंत्रणा व सर्वसामान्य नागरिकांपर्यत माहिती पोहोचवावी. तसेच राष्ट्रीय-राज्य आपत्ती प्रतिसाद दलाच्या संपर्कात रहावे. त्यांच्या कार्यपध्दतीची माहिती करुन घ्यावी. महानगरपालिका-नगरपालिका क्षेत्रातील नाले सफाई, ड्रेनेज, पाईपलाईन दुरूस्ती तात्काळ करण्यात यावी. धोकादायक व अनधिकृत होर्डिग ताबडतोब काढावेत.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com