अयोध्येतील राम मंदिराचं प्रतिकात्मक भूमिपूजन कराव!
अन्य

अयोध्येतील राम मंदिराचं प्रतिकात्मक भूमिपूजन कराव!

खासदार इम्तियाज जलील यांची मागणी

Rajendra Patil

औरंगाबाद : Aurangabad

करोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने मुस्लिम बांधवांना बकरी ईद प्रतिकात्मकरित्या साजरी करण्याचं आवाहन केलं आहे. त्याला औरंगाबादचे एमआयएम खासदार इम्तियाज जलील यांनी आक्षेप घेतला आहे. बकरी ईदच का प्रतिकात्मक साजरी करायची? असा सवाल करतानाच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही अयोध्येतील राम मंदिराचं प्रतिकात्मक भूमिपूजन करावं, अशी मागणी इम्तियाज जलील यांनी केली आहे. तर जलील यांच्यावर कारवाई करण्याची मागणी विश्व हिंदू परिषदेने केली आहे.

सरकारने बकरी ईद साध्या पद्धतीने आणि प्रतिकात्मक साजरी करण्याच आवाहन केलं आहे. बकरी ईद प्रतिकात्मक साजरी करायची आहे तर मग पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही ५ ऑगस्ट रोजी होणारं राम मंदिराचं भूमिपूजन प्रतिकात्मकरित्या साजरं करावं, सर्व नियम आम्हालाच का? असा सवालही त्यांनी केला आहे.

जलील यांच्या या वक्तव्याला विश्व हिंदू परिषदेने जोरदार आक्षेप घेतला आहे. जलील यांचं विधान सामाजिक तेढ निर्माण करणारं आणि बेजबाबदारपणाचं आहे. त्यामुळे त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी विहिंपने केली आहे.

इम्तियाज जलील यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना हा सवाल केला. यावेळी त्यांनी बकरे खरेदीच्या ऑनलाइन प्रक्रियेलाही विरोध केला. श्रीमंतांकडे स्मार्ट फोन आहेत. ते लोक ऑनलाइन पद्धतीने बकऱ्यांची खरेदी विक्री करू शकतात. पण खेड्यापाड्यातील गरीब शेतकऱ्यांनी काय करायचे? शेतकऱ्यांकडे महागडे फोन नसतात. अनेक शेतकऱ्यांकडे तर साधेही फोन नाहीत, मग त्यांनी बकऱ्यांची ऑनलाइन खरेदी विक्री करावी कशी? शिवाय शेतकऱ्यांकडे एक-दोन बकरे असतात, त्यासाठी त्यांनी फोन खरेदी करायचे का? असा सवाल करतानाच शासनाची बकरे खरेदीची ऑनलाइन प्रक्रिया अमान्य असल्याचं जलील म्हणाले.

मार्गदर्शक सूचना जारी

औरंगाबादचे महापालिका प्रशासक पांडेय यांनी बकरी ईदनिमित्त मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. करोनाच्या आजारामुळे सगळीकडे संसर्गजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे. सध्याच्या स्थितीत राज्यात सगळ्या धार्मिक कार्यक्रमांना बंदी आहे. त्यामुळे नागरिकांनी बकरी ईदची नमाज घरीच अदा करावी. मशीद, ईदगाह किंवा सार्वजनिक ठिकाणी नमाज अदा करू नये. प्रतिबंधित क्षेत्रात सध्या लागू करण्यात आलेले निर्बंध कायम राहतील. त्यात कोणत्याही प्रकारची शिथिलता दिली जाणार नाही.

जनावरांचे बाजार बंद राहतील. नागरीकांना जनावरे खरेदी करायची असल्यास त्यांनी ऑनलाइन पद्धतीने किंवा दूरध्वनीवरून जनावरांची खरेदी करावी. नागरिकांची शक्यतो प्रातिकात्मक कुर्बानी करावी. करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासन, महापालिका, स्थानिक प्रशासन व पोलिसांनी जाहीर केलेल्या नियमांचे पालन बंधनकारक असेल, असे मार्गदर्शक सूचनांत म्हटले आहे.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com