Saturday, April 27, 2024
HomeUncategorizedयेत्या रविवारी रंगणार 'स्वरझंकार' मैफल

येत्या रविवारी रंगणार ‘स्वरझंकार’ मैफल

औरंगाबाद – aurangabad

पुण्यातील व्हायोलिन अकादमीच्या (Violin Academy) वतीने येत्या रविवारी (३० ऑक्टोबर) रोजी स्वरझंकार मैफलीचे आयोजन करण्यात आले आहे. उस्मानपुऱ्यातील संत एकनाथ रंगमंदिरात (Sant Eknath Rangmandir) सायंकाळी सहा वाजेपासून ही मैफल रंगणार आहे. व्हायोलिन अकादमीतर्फे स्वरझंकारच्या माध्यमातून पं. शिवकुमार शर्मा, हरिप्रसाद चौरासिया, पं. हरिहरन, उस्ताद झाकीर हुसेन, पं. राजन साजन मिश्रा अशा अनेक दिग्गजांचे गायन-वादनाचा आनंद गेल्या अकरा वर्षांपासून औरंगाबादमधील रसिक घेत आहेत.

- Advertisement -

यंदाच्या स्वरझंकार मैफलीचे वैशिष्ट्य शास्त्रीय गायिका कौशिकी चक्रवर्ती ठरणार आहेत. पद्मभूषण अजय चक्रवर्ती यांच्या कन्या कौशिकी यांना वयाच्या दुसऱ्या वर्षांपासून शास्त्रीय संगीताचे धडे गिरवण्यास सुरुवात केली होती. पटियाला घराण्याच्या अग्रणी गायिका म्हणून त्यांना ओळखले जाते. मैफलीच्या पहिल्या सत्रात तेजस व राजस उपाध्ये व्हायोलिन ड्युएट सादर करून उपस्थित रसिकांना मंत्रमुग्ध करतील. तर दुसरे सत्र शास्त्रीय गायिका कौशिकी चक्रवर्ती गाजवतील. स्वरझंकार मैफलीत तबल्यावर ईशान घोष, हार्मोनियमवर मिलिंद कुलकर्णी तर सारंगीवर मुराद अली साथसंगत करतील.   

दिवाळीच्या धामधुमीनंतर औरंगाबादमधील संगीत रसिकांसाठी स्वरझंकार मैफल अनोखी मेजवानी ठरणार आहे. याठिकाणी शास्त्रीय संगीताची आवड असणाऱ्यांची संख्या मोठी असून स्वरझंकार मैफलीवर औरंगाबादकरांचे मोठे प्रेम लक्षात घेऊन हे सादरीकरण आयोजित केले असल्याचे स्वरझंकारचे राजस उपाध्ये यांनी आवर्जून नमूद केले.

- Advertisment -

ताज्या बातम्या