बाळ गायब केल्याने विवाहितेची आत्महत्या ; पतीला पोलीस कोठडी

बाळ गायब केल्याने विवाहितेची आत्महत्या ; पतीला पोलीस कोठडी
Tarunbharat

छत्रपती संभाजीनगर - Chhatrapati Sambhajinagar

पत्नी प्रियंका राठोड हिला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी हर्सूल पोलिसांनी पती अनिल राठोड याला अटक केली असून, त्याला पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी आर व्ही. सपाटे यांनी दिले.

मयत प्रियंकाचा भाऊ विशाल संजय चव्हाण याने दिलेल्या फिर्यादीनुसार चार महिन्यांपूर्वी प्रियंका बाळंतपणासाठी माहेरी आली होती. रुग्णालयात बाळाला जन्म दिल्यानंतर बाळासह ती माहेरी थांबलेली होती. प्रियंकाची नणंद संगीता आणि नंदोई प्रकाश चव्हाण बाळाला पाहण्यासाठी आले. बाळाची प्रकृती खराब असून त्याला रुग्णालयात दाखल करतो, असे म्हणत ते बाळाला घेऊन गेले. त्यानंतर पीडिता व तिचे घरचे वारंवार बाळाची चौकशी करीत होते, त्यावेळी बाळाची प्रकृती खराब असून ते रुग्णालयात दाखल असल्याचे सासरकडचे सांगत होते. सात-आठ दिवसांनी प्रियंका सासरी नांदण्यास गेली, तेव्हा बाळ मरण पावल्याचे सांगण्यात आले. त्यावरून पीडिता प्रियंकाला आरोपींनी बाळ विक्री केल्याचा संशय आला. प्रियंकाची वारंवार विचारपूस पाहता अनिल राठोड याने तिला मारहाण करून जिवे मारण्याची धमकी दिली.

१६ ऑक्टोबर रोजी पीडिता सासरवाडीतून बेपत्ता झाली. १७ ऑक्टोबर रोजी पीडिता सासरवाडीतील घरासमोरील एका झाडाला गळफास घेतलेल्या अवस्थेत सापडली. या प्रकरणात हर्सूल पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. आरोपी पतीला न्यायालयात हजर करण्यात आले असता, सहायक सरकारी वकील योगेश तुपे यांनी मयतेच्या बाळाचा शोध घ्यायचा आहे. गुन्ह्यातील आरोपीच्या साथीदारांना अटक करायची आहे, मयताला मारहाण करून जिवे मारण्याची धमकी देण्याबाबत तपास करायचा आहे, आरोपींनी पीडितेला आत्महत्येस का प्रवृत्त केले, याचादेखील तपास बाकी असल्याने आरोपीला पोलीस कोठडी देण्याची विनंती न्यायालयाकडे करण्यात आली.

   
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com