कोरोनाचे भय... मीटरमध्ये हात घातला तरीही वाचला, मग कोरड्या विहिरीत उडी घेतली!

अखेर त्या तरुणाचा मृत्यू
कोरोनाचे भय... मीटरमध्ये हात घातला तरीही वाचला, मग कोरड्या विहिरीत उडी घेतली!

औरंगाबाद - Aurangabad

कोरोना संसर्ग झाल्याचे समजताच एका तरुणाने शेतात जाऊन मीटर बॉक्समध्ये हात घालून जीव देण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यातूनही त्याचा जीव बचावल्यानंतर त्याने कोरड्या विहिरीत उडी मारली. नशीब बलवत्तर असल्याने त्यातूनही बचावला. उपचारासाठी दाखल केल्यानंतर दोन दिवसांनी शनिवारी या तरुणाचा मृत्यू झाला. ही दुर्देवी घटना शिंदगाव (ता. तुळजापूर, जि. उस्मानाबाद) येथे घडली. या घटनेनंतर गावात हळहळ व्यक्त होत आहे.

शिंदगाव येथील एका शेतकरी तरुणाला आजारपणामुळे त्याच्या मोठ्या भावाने आलूर (ता. उमरगा) येथे डॉक्टरांकडे नेले. करोनाची लक्षणे दिसत असल्याचे सांगून डॉक्टरांनी मोठ्या रुग्णालयात दाखल करण्याचा सल्ला दिला. मोठ्या भावाने त्याला घरी नेले. या तरुणाला चार मुले असून कुटुंबाशी चर्चा करुन हा रुग्ण घराबाहेर झोपला होता. त्या दरम्यान कुटुंबातील सर्वजण शेताकडे गेले. करोनाच्या भीतीने हा तरुण शेताकडे गेला आणि विहिरीवरील मीटर बॉक्समध्ये हात घालून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. त्यातून सुदैवाने बचावला. त्यानंतर त्याने कोरड्या विहिरीत उडी मारून आत्महत्येचा प्रयत्न केला. विहिरीत झाडेझुडपे असल्याने तो मध्येच जाळीमध्ये अडकला. हा प्रकार कुटुंबातील एका व्यक्तीने पाहिला, तोवर आजूबाजूचे नागरिक जमा झाले होते. त्यांनी तरुणाला विहिरीबाहेर काढले तेव्हा हा तरुण बेशुद्ध व जखमी अवस्थेत होता.

जखमी अवस्थेतील तरुणावर डॉक्टरांनी उपचार सुरू केले. तेव्हा त्याला कोरोनाची बाधा झाल्याचे निदान झाले. उपचारानंतर तरुण शुद्धीवर आला होता. परंतु, शनिवारी उपचारादरम्यान दुर्देवाने मृत्यू झाला. या घटनेनंतर गावात हळहळ व्यक्त होत आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com