Saturday, April 27, 2024
HomeUncategorizedऐन सणासुदीमध्ये वाढले साखरेचे भाव

ऐन सणासुदीमध्ये वाढले साखरेचे भाव

औरंगाबाद – Aurangabad

सात महिन्यांपासून स्थिर असणाऱ्या साखरेचे भाव ऐन सणासुदीमध्ये वाढले आहेत. ठोक बाजारात क्विंटलमागे 150 ते 200 रुपयांनी भाव वाढले आहेत; परिणामी, किरकोळ बाजारातही साखरेचे भाव (Sugar prices) वाढले आहे. सणासुदीच्या काळात साखरेची मागणी वाढते, मात्र असे असतानाच यंदाच्या महिन्यात साखरेच्या कोटा एक लाख टनाने कमी झाल्याचे सूत्रांनी सांगितले.

- Advertisement -

गेल्या 14 महिन्यांपासून सर्वांना करोना संकटाचा सामना करावा लागत आहे. मध्यंतरी काही महिने दिलासा देणारी ठरली, परंतु मार्चपासून पुन्हा एकदा करोनाने कहर केला होता. सध्या करोना रुग्णांच्या संख्येत घट असून नियमही शिथिल करण्यात आले असले, तरी (corona) करोनाचे संकट कायम आहे. एकीकडे या संकटाचा सामना, त्याचे परिणामाचा सामना करावा लागत असतानाच दुसरीकडे महागाईमुळे नागरिकांना मोठी आर्थिक झळ सोसावी लागत आहे. त्यात ऐन सणासुदीच्या तोंडावर साखरचे भाव मात्र वाढले आहे.

गेल्या सात महिन्यांपासून साखरेचे भाव स्थिरच होते. मात्र, या आठवड्यात साखरेचा तोरा वाढला आहे. दरम्यान, यासंदर्भात दी जनरल किराणा मर्चन्ट असोसिएशनचे अध्यक्ष नीलेश सेठी यांना संपर्क साधला असता, त्यांनी ठोक बाजारात क्विंटलमागे 150 ते 200 रुपयांनी साखरेच्या दरात वाढ झाल्याचे सांगितले. पूर्वी 3 हजार 300 रुपये प्रतिक्विंटलने मिळणाऱ्या साखरेसाठी सध्या तीन हजार 450 ते तीन हजार 500 रुपये भाव झाल्याचे त्यांनी सांगितले. ठोक बाजारात भाव वाढ झाल्याने किरकोळ बाजारातही त्यांचा परिणाम दिसून येत आहे. किरकोळ बाजारात 37 ते 38 रुपये प्रतिकिलो साखरेचा भाव झाला आहे. तर साखर हा महत्त्वाचा घटक असल्याने व त्यावर पुढील व्यापार अवलंबून असल्याने शक्यतो अनेक व्यापारी खरेदी किंमतीनेच साखर विक्री करतात, अशी माहिती किराणा दुकानदार राजेंद्र लखोटिया यांनी सांगितले. जिल्ह्यात साधारणपणे दररोज 700 ते 800 क्विंटल साखरेची मागणी असते. सणासुदीच्या काळात मागणी वाढते, साधारणपणे ही मागणी 1100 ते 1200 क्विंटलपर्यंत जाते. त्यात करोनाचे रुग्ण कमी झाल्याने निर्बंध शिथिल झाले आहेत. त्यामुळेही हॉटेलसह अन्य ठिकाणाहून साखरेला मागणी होत आहे.

यंदा साखर कारखान्यांना साखर विक्रीचा 21 लाख टन कोटा केंद्र सरकारने मंजूर केला आहे. मागील महिन्याच्या तुलनेत हा कोटा एक लाख मेट्रीक टनाने कमी असल्याचे सूत्रांनी सांगितले. देशात सहकारी व खासगी मिळून सुमारे 460 साखर कारखाने आहेत. यापैकी महाराष्ट्रात 190 तर मराठवाड्यात 46 कारखाने आहेत. यंदा देशात सुमारे 305 लाख टन साखरेची निर्मिती झाल्याचेही सूत्रांनी सांगितले.

- Advertisment -

ताज्या बातम्या