संस्कृतीचा अभ्यास गांभीर्याने होत नाही-लक्ष्मीकांत धोंड यांची खंत

संस्कृतीचा अभ्यास गांभीर्याने होत नाही-लक्ष्मीकांत धोंड यांची खंत

औरंगाबाद - aurangabad

विज्ञानाचे (Science) सिद्धांत वेळोवेळी प्रयोग करून मान्य केले जातात. परंतु, संस्कृतीचा अभ्यास करण्यात भारतीय माणूस कमी पडतो. आपल्याकडे रंगभूमीची परंपरा ग्रीक रंगभूमीच्या आधी आहे. हे सिद्ध करण्यासाठी वेदांकडे पाहण्याचा दृष्टिकोन कमी आहे. त्यामुळे आपण मागे पडतो, अशी खंत धोंड यांनी व्यक्त केली.

औरंगाबाद आकाशवाणीचे निवृत्त उद्घोषक ग्रंथ संग्राहक आणि साहित्यिक अनंत काळे यांच्या कार्याला उजाळा देणारे 'अनंत स्मृती' या स्मरणिकेचे प्रकाशन आणि मराठी रंगभूमी दिनानिमित्त "भारतीय रंगभूमीचे प्राचीनत्व" या विषयावर व्याख्यानाचे आयोजन गोविंदभाई श्रॉफ कला अकादमी ,सरस्वती भुवन परिसर करण्यात आले होते. यावेळी व्यासपीठावर डॉ. छाया महाजन, जयश्री काळे, प्राचार्य प्रदीप जब्धे, डॉ. मकरंद पैठणकर यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.

मराठी रंगभूमी दिनानिमित्त "भारतीय रंगभूमीचे प्राचीनत्व" याविषयावर लक्ष्मीकांत धोंड यांनी मराठी रंगभूमीच्या इतिहासाकडे उपस्थितांचे लक्ष वेधले. १६७५ ते १८८० या काळात तंजावर येथील कलासक्त भोसले घराण्याने मराठी नाटके लिहिली. आजही तंजावरच्या सरस्वती महालात ताडपत्रीवर आपल्याला नाटके दिसतात. परंतु, महाराष्ट्रात ते झाले नाही. म्हणून त्याचे प्राचीनत्व नाकारता येत नाही. हे सांगताना त्यांनी यजुर्वेद, ऋग्वेद, उपनिषद, नटसूत्र, भारत मुनींचे नाट्यशास्त्र, कथासूक्त यावरही प्रकाशझोत टाकला. आपण आपल्याच ग्रंथाकडे डोळसपणे पाहण्याची गरज असल्याचेही त्यांनी नमूद केले.


छाया महाजन म्हणाल्या की, हल्ली व्यक्ती जिवंत असतानाच विशेषांक निघतात. परंतु, कुठल्याही लोकनेत्यापेक्षा जास्त प्रेम, लोकसंग्रह अनंत काळे यांचा होता. त्यांच्या निधनानंतर केवळ पाच महिन्यात त्यांच्यावर स्मरणिका निघते ही मोठी गोष्ट आहे. 

यावेळी विजय रणदिवे आदी मान्यवरांनी अनंत काळे यांच्या स्मृतींना उजाळा दिला. प्रकाशक अशोक कुमठेकर यांनी मनोगत व्यक्त केले. सूत्रसंचालन दीपाली कुलकर्णी यांनी केले. या अंकाचे संपादन डॉ. आरतीश्यामल जोशी, नीता पानसरे, डॉ. अशोक वाकोडकर, डॉ. प्रदीप जब्धे, अशोक अर्धापुरे, अमृता काळे यांनी केले. आभार अशोक अर्धापूरे यांनी मानले. कार्यक्रमाची सांगता पसायदानाने झाली.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com