अहो आश्चर्यम... शाळेची इमारतही न पाहता पहिलीचे विद्यार्थी दुसरीत!

स्कुल ना गये, फिर भी दुसरी कक्षा मे गये हम'
अहो आश्चर्यम... शाळेची इमारतही न पाहता पहिलीचे विद्यार्थी दुसरीत!

औरंगाबाद - Aurangabad

आपल्या शाळेची इमारत... आपल्याला कोणत्या मॅडम-सर शिकवतात... आपले सवंगडी कोणते हे सगळं समजण्यापूर्वीच पहिलीतील विद्यार्थी कोणत्याही प्रकारची परीक्षा न देता दुसरीच्या वर्गात गेले आहेत. कोरोना संसर्गकाळामुळे हे सगळं घडले असले तरी 'स्कुल ना गये, फिर भी दुसरी कक्षा मे गये हम' असे  सोशल मीडियात या अनोख्या परिस्थितीवर जोक्स फिरताना पाहायला मिळत आहेत.

कोरोनाच्या पार्श्‍वभूमीचा शैक्षणिक क्षेत्रालाही मोठा फटका बसला आहे. प्राथमिक शाळेत पाय न टाकताच पहिलेचे विद्यार्थी थेट दुसरीत गेले आहे. कोरोनामुळे वर्षभर शाळा बंद असतानाही पास झाल्याचा आनंद मात्र बोचरा असल्याचे दिसून येते.

कोरोनामुळे गेल्या एक वर्षांपासून सर्व शहरी व ग्रामीण भागात प्राथमिक, माध्यमिक व कॉलेजचा ठराविक काळ वगळता सर्व प्रकारच्या शाळांना कुलूप ठोकल्या गेले आहे. मागच्या वर्षी बारावीची परीक्षा संपल्यानंतर व दहावी बोर्ड परीक्षेचा शेवटचा पेपर बाकी असतांना लॉकडाऊनची नामुष्की ओढवल्यामुळे इतर सर्व वर्गाच्या परीक्षा न होता पुढल्या वर्गात पाठविण्याचा निर्णय शासनाला घ्यावा लागला होता. तिच काहीशी परिस्थिती यावर्षी पण झाली असून बारावी व दहावी परीक्षा होणार की नाही, याबाबत स्पष्टता नसली तर इतर सर्व वर्गातील विद्यार्थ्यांना पुढील वर्गात बढती मिळाली आहे. पहिल्या वर्गातील नाममात्र प्रवेश झालेले विद्यार्थी तर यावर्षी शाळाच उघडू न शकल्याने प्राथमिक शाळेत प्रवेश न करता थेट दुसर्‍या वर्गात जाऊन पोहचले आहेत. एकप्रकारे 'स्कुल चले हम..या ऐवजी, स्कुल ना गये, फिर भी दुसरी कक्षा मे गये हम' अशी म्हणायची पाळी या चिमुरड्यावर आजपर्यंतच्या इतिहासात कदाचित पहिल्यांदाच आली असावी.

गेल्या एक वर्षांपासून कोरोना संक्रमणाचा धोका कमी-जास्त कायम असल्याने अर्थव्यवस्था तर धोक्यात आली आहेच. सोबतच शिक्षणाचेही तीन-तेरा झाले आहेत. गेल्या एक वर्षांपासून ऑनलाइन शिक्षण पद्धतीतून शिकविण्याचा शाळांचा फंडा पुढे आला असला तरी गरिबांसाठी मोबाईल व त्यासाठी लागणारा रिचार्ज परवडणारा नसल्याने या शिक्षण पद्धतीतून अनेक विद्यार्थी हक्काच्या शिक्षणापासून वंचित ठरत आहेत. माध्यमिक शाळा व कॉलेज मध्यंतरीच्या काही कालावधीसाठी सुरू झाल्या होत्या. मात्र, कोरोना रुग्णसंख्या झपाट्याने वाढत असल्याने सर्व शाळा सद्या बंद करण्यात आल्या आहेत.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com