Friday, April 26, 2024
HomeUncategorizedसूर्य ग्रहणाचे नेमके प्रकार किती?

सूर्य ग्रहणाचे नेमके प्रकार किती?

खगोलीय घटनांसाठीही सन २०२० हे वर्ष अतिशय वेगळे आणि अचंबित करणारे ठरत आहे. यावर्षी एकूण दोन सूर्य ग्रहणे लागणार आहेत. जून आणि डिसेंबर महिन्यात सूर्यग्रहण आहे. सन २०२० मधील पहिले सूर्यग्रहण ज्येष्ठ अमावास्या म्हणजेच २१ जून २०२० रोजी लागणार आहे. हे सूर्यग्रहण एकूण सुमारे ५ तास ४८ मिनिटे असेल. सूर्यग्रहण असो वा चंद्रग्रहण याचे काही प्रकार असतात. प्रत्येक ग्रहण हे एकासारखे नसते. जेव्हा चंद्र हा सूर्य व पृथ्वीच्या मध्ये येतो, तेव्हा सूर्यग्रहण आणि जेव्हा पृथ्वी ही सूर्य व चंद्राच्या मध्ये येते, तेव्हा चंद्रग्रहण घडते. सूर्य ग्रहणाचे नेमके प्रकार किती आहेत?

खग्रास सूर्यग्रहण

- Advertisement -

जेव्हा सूर्य पूर्णपणे चंद्राच्या मागे लपला जातो, तेव्हा दिसणाऱ्या स्थितीला खग्रास सूर्यग्रहण म्हणतात. खग्रास सूर्यग्रहणाच्या वेळेस, सूर्य चंद्रामागे गेल्यानंतर चंद्राच्या चारही बाजूंनी सूर्याची किरणे दिसतात. यांचा आकार वर्तुळाकार असतो. त्यामुळे या किरणांना तेजोवलय असे म्हणतात. चंद्र हा सूर्य आणि पृथ्वीपेक्षाही खूपच लहान आहे. पण ग्रहण लागताना चंद्र पृथ्वीच्या अधिक जवळ आल्यामुळे पृथ्वीवरून पाहताना आपल्याला सूर्य आणि चंद्र आकाराने एकसारखे दिसतात. चंद्र पृथ्वी आणि सूर्याच्या मध्ये आला की, चंद्राचे बिंब सूर्यबिंबाला पूर्णपणे झाकू शकते. ही अवस्था दिसली की, खग्रास सूर्यग्रहण लागले, असे म्हटले जाते. खग्रास सूर्यग्रहणात डायमंड रिंग एकदम स्पष्ट दिसते.

कंकणाकृती सूर्यग्रहण

पृथ्वी आणि चंद्राच्या कक्षा काहीशा लंबगोलाकार आहेत. चंद्र या कक्षेत पृथ्वीपासून दूरच्या बिंदूजवळ असतो. अशावेळी पृथ्वीवरून चंद्रबिंबाचा आकार सूर्यबिंबापेक्षा लहान दिसतो. जेव्हा चंद्र पृथ्वीपासून त्याच्या सर्वाधिक लांब अंतरावर राहून सूर्य आणि पृथ्वीच्या मध्ये येऊन सूर्याच्या प्रकाशाला झाकून टाकतो, तेव्हा कंकणाकृती सूर्यग्रहण पाहायला मिळते. या सूर्यग्रहणात चंद्र जास्त अंतरावर असल्यामुळे तो सूर्याला पूर्णपणे झाकू शकत नाही. अशावेळी सूर्याची वर्तुळाकार कडी एखाद्या कंकणासारखी म्हणजे बांगडीसारखी दिसून येते. त्यालाच ‘कंकणाकृती सूर्यग्रहण’ म्हणतात. सूर्याच्या या स्थितीला खगोलप्रेमींनी ‘रिंग ऑफ फायर’, अग्निवलय, अग्निकंकण अशीही नावे दिलेली आहेत. कंकणाकृती सूर्यग्रहणात चंद्रबिंबाचा आकार लहान असल्याकारणाने सूर्य संपूर्ण झाकला जात नाही. म्हणून डायमंड रिंग दिसत नाही.

​खंडग्रास सूर्यग्रहण

याचा चंद्र पृथ्वीपासून किती अंतरावर आहे, याच्याशी संबंध नसतो. जेव्हा सूर्याचा काही भागच चंद्राच्या मागे जातो, तेव्हा दिसणाऱ्या स्थितीला खंडग्रास सूर्यग्रहण म्हणतात. थोडक्यात ज्या सूर्यग्रहणात चंद्र हा सूर्याला पूर्णपणे व्यापू शकत नाही त्या सूर्यग्रहणाला खंडग्रास म्हणतात. कंकणाकृती हेदेखील खंडग्रासच आहे. फक्त यात संपूर्ण रिंग दिसते म्हणून हा प्रकार वेगळा गृहीत धरला जातो. खंडग्रास स्थितीत चंद्र संपूर्णपणे सूर्यासमोर आलेला दिसत नाही. त्याचा काहीसा भाग सूर्याला झाकू शकतो. चंद्र हा सूर्य आणि पृथ्वीच्या मधून जाताना त्याची स्थिती काय आहे, यावरून ग्रहण कोणत्या प्रकारचे लागणार आहे, हे सांगितले जाते.

- Advertisment -

ताज्या बातम्या