
नाशिक | प्रतिनिधी | Nashik
तुर्की येथे दि. 19 ते 27 मार्चदरम्यान होणाऱ्या जागतिक मास्टर टेनिस स्पर्धेसाठी येवला येथील राष्ट्रीय लॉन टेनिस खेळाडू यती गुजराथी (Yati Gujrathi) यांची भारतीय टेनिस संघाच्या कर्णधारपदी नियुक्ती करण्यात आली आहे...
ऑल इंडिया टेनिस असोसिएशनने जाहीर केलेल्या 45 वयोगटातील संघात त्यांची निवड झाली आहे. नवभारत क्रीडा मंडळाचे राष्ट्रीय लॉन टेनिस खेळाडू यती गुजराथी यती गुजराथी यांचे 45 वर्ष वयोगटामध्ये इंटरनॅशनल टेनिस फेडररेशनच्या मानांकनानुसार सिंगल्समध्ये 90 आणि डबल्समध्ये 32 वे मानांकन आहे. तसेच त्यांचे भारतात दोन्ही गटामध्ये 2 नंबरचे मानांकन आजदेखील कायम आहे....
मागील वर्षभरात विविध स्पर्धेत भाग घेऊन यती गुजराथी यांनी यश संपादन केले आहे. त्यात प्रामुख्याने इंदोर, मुंबई आणि थायलंड येथील स्पर्धेत यश संपादन केल्याने त्यांची निवड करण्यात आली आहे.
येवल्यातून राष्ट्रीय संघात प्रवेश मिळवणे ही कौतुकाची बाब आहे. यती गुजराथी यांना टेनिसचा वारसा त्यांचे आजोबा बन्सीलाल गुजराथी यांच्यापासून मिळाला आहे. त्यांचे वडील सुशील गुजराथी हेदेखील चांगले खेळाडू असून त्यांनीही अनेक स्पर्धेत कौशल्य दाखवून यश संपादन केले आहे.
गुजराथी यांना राष्ट्रीय खेळाडू श्रीकांत पारेख आणि शिरीष नांदूरडीकर यांचे मार्गदर्शन लाभले आहे. त्यांच्या निवडीबद्दल राज्याचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ, आमदार नरेंद्र दराडे, आमदार किशोर दराडे, आमदार सत्यजित तांबे, माणिकराव शिंदे, अंबादास बनकर, माजी आमदार मारोतीराव पवार यांच्यासह नवभारत क्रीडा मंडळातील सभासदांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.