
दिल्ली | Delhi
तुर्की आणि सीरियामध्ये सोमवारी (६ फेब्रुवारी) झालेल्या ७.८ तीव्रतेच्या भूकंपात आतापर्यंत एकूण ८००० हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. तर, मोठ्या संख्येत लोक जखमी झाले आहेत.
एवढेच नव्हेतर कित्येक लोक ढिगाऱ्याखाली अडकल्याने मृतांच्या संख्येत वाढ होण्याची शक्यता आहे. या विनाशकारी भूकंपात तुर्कीचा २८ वर्षीय फुटबॉलपटू अहमत इयुप तुर्कस्लानचाही मृत्यू झाला आहे. अहमत इयुप तुर्कस्लानच्या मृत्युच्या बातमीनंतर फुटबॉलविश्वात शोककळा पसरली आहे.
६ फेब्रुवारीला टर्कीमध्ये भूकंप झाला आणि ७ फेब्रुवारीला टर्कीच्या गोलकीपरच्या मृत्यूच्या वृत्ताची पुष्टी झाली. गोलरक्षक अहमत इयुप तुर्कस्लान सध्या येनी मालत्यास्पोर या क्लबकडून खेळत होता. या क्लबसोबत त्यांचा एक वर्षाचा करार होता. पण, करार संपण्यापूर्वीच टर्कीच्या गोलरक्षकाचे निधन झाले.
अहमत इयुप हा मागील दहा वर्षांपासून वरिष्ठ स्तरावरील फुटबॉल मध्ये खेळत होता. त्याने आतापर्यंत पाच विविध संघांचे प्रतिनिधित्व केलेले. यादरम्यान त्याने ८७ सामने खेळले. अनेकदा तो राष्ट्रीय संघाच्या शिबिरात देखील सहभागी झाला होता. विशेष म्हणजे काही दिवसांपूर्वीच त्याचा विवाह देखील झालेला.
दरम्यान, भारताने मंगळवारी श्वान पथक, आर्मी फील्ड हॉस्पिटल आणि चार लष्करी विमानांमध्ये मदत सामग्रीसह शोध आणि बचाव पथक तुर्किये येथे पाठवले. ३० खाटांची वैद्यकीय सुविधा उभारण्यासाठी भारताने तुर्कि येथे भारतीय लष्कराचे फील्ड हॉस्पिटल पाठवले.
हवाई दलाच्या विमानात ४५ सदस्यीय वैद्यकीय पथक रवाना करण्यात आले. ज्यामध्ये क्रिटिकल केअर स्पेशालिस्ट आणि सर्जन यांचा सहभाग आहे. एकूण चार विमानांनी ही मदत तुर्की येथे पाठवली आहे. यामध्ये भारतीय लष्कराच्या वैद्यकीय पथकातील ५४ सदस्यांचा तसेच सुविधा उभारण्यासाठी वैद्यकीय आणि इतर उपकरणांचा समावेश होता.