
दिल्ली | Delhi
टोकियोमध्ये सुरू असलेल्या पॅरालिम्पिक स्पर्धेत (Tokyo Paralympics 2020) भारताची टेबल टेनिसपटू (Table tennis player) भाविनाबेन पटेल (Bhavinaben Patel) हिने देशाला पहिले पदक मिळवून दिले आहे. रविवारी झालेल्या मॅचमध्ये तिने रौप्यपदकाची (Silver Medal) कमाई केली. राष्ट्रीय क्रीडा दिनीच (National Sports Day) भाविकाबेनने भारताला पदक जिंकून दिल्याने त्याला महत्त्व प्राप्त झाले आहे.
अंतिम फेरीत भाविनाचा सामना जागतिक क्रमवारीत पहिल्या क्रमांकावर असलेल्या चीनच्या झोउ यिंगशी झाला. यिंगने जेतेपदाच्या लढतीत भाविनाबेनचा ३-० असा पराभव केला. टेबल टेनिसमध्ये पदक जिंकणारी भाविना पहिली खेळाडू ठरली आहे. पराभव होऊनही भाविनाने आपल्या खेळाने मने जिंकली आहेत. भारताच्या भाविनाबेन पटेलने उपांत्य फेरीत चीनच्या मियाओ झांगचा ३-२ असा पराभव केला होता.
पंतप्रधान मोदींकडून कौतुकाचा वर्षाव
भाविनाबेनच्या या कामगिरीनंतर देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी ट्विट करत भाविनाबेन पटेलच्या प्रयत्नांचे कौतुक केले आहे. तसेच तिला भविष्यातील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.
पॅरालिम्पिकमध्ये तीन क्रीडाप्रकारात भारताने आतापर्यंत १२ पदके प्राप्त केली आहेत. यात अॅथलेटिक्स (३ सुवर्ण, ४ रौप्य तर ३ कांस्य, पॉवरलिफ्टिंग (१ कांस्य) आणि स्विमिंग (१ सुवर्ण) यांचा समावेश आहे. मात्र टोक्यो पॅरालिम्पिकमध्ये भारताचे हे पहिलेच पदक आहे.