
मुंबई | Mumbai
टोकियोमध्ये सुरू असलेल्या पॅरालिम्पिक (Tokyo Paralympics) क्रीडा स्पर्धेतून भारताला (India) सातत्याने चांगली बातमी मिळत आहे. भारतीय खेळाडू एकापाठोपाठ एक पदकं जिंकत आहेत. मात्र, या सगळ्यामध्ये आज देशाची निराशा झाली आहे. देशाच्या पदकतालिकेतून एक पदक कमी झाले आहे.
टोकियोमध्ये खेळल्या जाणाऱ्या पॅरालिम्पिक खेळांमध्ये भारताचे विनोद कुमार यांनी चमकदार कामगिरी करताना कांस्यपदक जिंकले होते. पण, स्पर्धा आयोजक समितीने तांत्रिक कारणासाठी हा निकाल राखून ठेवला होता. हा निकाल आज आयोजक समितीने दिला असून दुर्दैवाने विनोद कुमार यांनी कांस्य पदक गमावले आहे. विनोद कुमारांना अपंगवत्वाच्या श्रेणीत न बसल्याने आपले पदक गमवावे लागले आहे.
४१ वर्षीय विनोद कुमार हे थाळीफेक क्रीडाप्रकारात भारताचे प्रतिनिधित्व करत होते. F52 प्रकारात पोलंडच्या पीओत्र कोसेविझ याने २०.०२ मीटर तर क्रोएशियाच्या वेलिमिर सँडॉरने १९.९८ मीटर फेक केली आणि अनुक्रमे सुवर्ण आणि रौप्य पदकाची कमाई केली. त्यानंतर भारताच्या विनोद कुमार यांनी १९.९१ मीटर थाळीफेक करत कांस्यपदक पटकावले. त्यांनी F52 प्रकारात मिळवलेल्या पदकाला काही स्पर्धकांनी आव्हाने दिले. ज्या प्रकारचे अंपगत्व असल्याने F52 प्रकारात सहभागी होण्यास खेळाडू पात्र ठरतो, त्या निकषांमध्ये विनोद कुमार पात्र ठरत नसल्याचे पॅरालिम्पिक व्यवस्थापनातील टेक्निकल विभागाच्या तपासात उघड झाले. त्यामुळे विनोद कुमार यांचे पदक काढून घेण्यात आले.
काय आहेत नियम आणि F52 स्पर्धा?
विनोद कुमार असलेल्या F52 स्पर्धेत सहभागी होणारे स्पर्धक यांच्या मांसपेशींमध्ये कमजोर असते. त्यांना अधिक हालचाली करता येत नाही. तसंच काहींच्या हातात, पायातही विकार असतो. तसंच ज्याच्या मणक्यात त्रास असतो, त्याचा एखादा शरीराचा भाग तुटलेला असतो असे खेळाडूही यामध्ये सहभाग घेतात. वर्गीकरणादरम्यान खेळाडूंना त्यांचे प्रतिस्पर्धी ज्यांचा आजार किंवा त्रास एकसारखा असतो ते निवडण्याची संधी मिळते. याच दरम्यान विनोदच्या आजारावर प्रतिस्पर्धी खेळाडूंनी प्रश्न उचलले, ज्यामुळे चौकशीनंतर विनोदचं पदक अयोग्य ठरवण्यात आलं.