
आनंद खरे, क्रीडा समीक्षक
22व्या फिफा विशवचषक( FIFA World Cup-2022 ) स्पर्धेतील साखळी सामन्यांमध्ये चांगलेच उलटफेर बघायला मिळाल्यामुळे आता राऊंड ऑफ 16 मध्ये काही चमत्कार दिसून येतात का याची सर्वांना उत्सुकता होती. साखळीमधील अनपेक्षित निकाल समोर असल्यामुळे या सहा सामन्यामध्ये दिग्गज संघानी कोणतीही रिस्क न घेता खेळ केला. नेदरलँड, इंग्लंड, अर्जेटिना, फ्रांस, आणि ब्राझील यांनी आक्रमक भूमिका घेत समोरच्या संघावर दबाव टाकला आणि आपले विजय साजरे केले आहेत. तर क्रोएशियाला पेनटी शूट आउटने तारले आहे.
ब्राझील - या सामन्यात ब्राझीलचा स्टार नेमार मैदानात उतरल्यामुळे संघात नवे चैतन्य संचारले. आक्रमक खेळासाठी प्रसिद्ध असलेल्या ब्राझीलच्या खेळाडूंनी सामन्याच्या सुरवातीपासूनच आपल्या आक्रमणात धार आणली. आणि सातव्या मिनिटाला व्हिनिचेऊस ज्युनियरने कोरियाचा गोली किम सेऊंग गूमला चकवण्यात यश मिळवत गोल करून आघाडी प्रस्थापित केली. तर पाच मिनिटांनी मिळालेल्या पेनल्टीचे नेमारने आपल्या स्टाईलमध्ये गोलमध्ये रूपांतर करून ब्राझीलचीआघाडी दुप्पट केली. त्यानंतरही ब्राझीलच्या सततच्या आक्रमणामुळे 29 व्या मिनिटाला उजव्या बाजूने गियागो सिल्वाने दिलेल्या पासवर रिचर्डसनने तिसरा गोल डागून आपली क्षमता दाखवून दिली. तर सहा मिनिटांनी लुकास पेक्वेटाने कोरियाचा गोली किम सेऊंग गूमला पुन्हा गुंगारा देत गोल करून ब्राझीलला 4-0 अशी मोठी आघाडी मिळवून दिली.
दुसर्या सत्रात ब्राझीलने आपले प्रयत्न सुरूच ठेवले. तर प्रति आक्रमणामध्ये कोरीयाकडून बूम किन, चा बिन मीन, कर्णधार सोन हुंग मीन यांनी गोल करण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले. त्यांना 71 व्या मिनिटाला यश जरूर आले. कोरियाच्या पैक सेउंग हो ने फ्री केकचा सहारा घेत गोल करून आपली पिछाडी एक गोलने कमी केली. परंतु त्यानंतर ब्राझीलचे बचावपटू आणि गोली यांनी कोरीयाच्या आक्रमणाला दाद दिली नाही आणि ब्राझीलने विजय साजरा करून उपउपांत्य फेरी गाठली आहे.
जपान - गत 2018 च्या विश्वचषक स्पर्धेचे उपविजेते क्रोएशिया आणि जिद्दी जापान यांच्यातील लढत चुरशीची होणार हे काल सांगितल्याप्रमाणेच या सामन्यात चांगलीच चकमक बघायला मिळाली. गटवर सखालीचा विचार केल्यास फगटात समावेश असलेल्या क्रोएशीयाला बेल्जियम आणि मोरोक्को यांच्याकडून बरोबरी स्वीकारावी लागली. त्यांनी केवळ कॅनडाला पराभूत केल्यामुळे आणि मोरोक्कोने बलाढ्य बेल्जियमला पराभूत केल्यामुळे क्रोएशीयाला एक गुणांच्या फरकाने आपल्या गटातून दुसर्या क्रमांकाने बाद फेरीत प्रवेश करता आला होता. तर जपानने सखाळीमध्ये आपल्या ई गटात विश्वविजेते जर्मनी आणि स्पेन यांना पराभूत करून सर्वाना चकित केले आणि या गटातून पहिल्या क्रमांकाने बाद फेरीमध्ये प्रवेश मिळविला होता. त्यामुळे या सामन्यात गत उपविजेते क्रोएशियाला जपान असाच धक्का देतो का याकडे सर्वांचे लक्ष होते. सुरवातीला क्रोएशीयाचा हिरो लुका मॉडरीक, मॅटेओ कोवासिक, जोस्को जोव्हेनोवीक, निकोला व्लासीच यांनी बॉलचा ताबा जास्त वेल आपल्याकडे ठेवून सतत आक्रमण करून जपानच्या गोलमध्ये शिरकाव करत होते. परंतु प्रति आक्रमणात जपानने बाजी मारली. देझेन मॅइडोने गोलसमोर मिळालेल्या पासवर गोल करून चत्मकार केला.
परंतु क्रोएशीयाच्या डेजिन लोव्हरेनच्या पासवर इव्हान पेरिसिकने गोल करून 1-1 अशी बरोबरी केली. यानंतर दोन्हीहो बाजूनी गोल करण्यासाठी अनेक प्रयत्न केले. निर्धारित वेळेत 1-1 बरोबरी असल्यामुळे अतिरिक्त वेळत गेलेल्या या सामन्यात आक्रमाने प्रति आक्रमणे होत होती. मात्र गोल झळकले नाही. या बरोबरीमुळे पेनल्टीचा अवलंब करावा लागला. यामध्ये मात्र क्रोएशियाने बाजी मारली क्रोएशियाकडून निकोला व्लासीच, मार्सेलो ब्रॉझोव्हिक आणि मॅरिओ पेस्लीक यांनी गोल केले तर जपानकडून ताकूमा असानोला गोल केला.परंतु ताकूमी मिनमिनो, कोरू मीतोमा, कर्णधार मेया योशीदा यांच्या पेनल्टी फेल गेल्यामुळे जपानचा 3-1 ने पराभव झाल्यामुळे क्रोएशीयाने पहिल्या आठ मध्ये आपले स्थान पक्के केले. आता त्यांना उपउपांत्य फेरीत बलाढ्य ब्राझीलशी सामना करावा लागणार आहे.