क्रिकेट जगातील सर्वात हुशार खेळाडू
क्रीडा

क्रिकेट जगातील सर्वात हुशार खेळाडू

अंपायर सायमन टॉफेलकडून या भारतीय खेळाडूचं कौतूक

Ramsing Pardeshi

मुंबई - Mumbai

क्रिकेट सामन्यादरम्यान परिस्थिती कितीही प्रतिकूल असली तरीही भारतीय संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी शांत असतो. २००७ मध्ये टी-२० विश्वचषक, २०११ वनडे विश्वचषक आणि २०१३ मध्ये चँपियन्स ट्रॉफी - आयसीसीच्या या तीन स्पर्धा जिंकणारा धोनी जगातील एकमेव कर्णधार आहे. इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) मध्ये धोनीने चेन्नई सुपर किंग्जचं नेतृत्व करताना ३ वेळा कप जिंकला आहे.

आयसीसीच्या एलिट पॅनलचे अंपायर सायमन टॉफेल यांनी नुकतेच महेंद्रसिंग धोनीचे कौतुक करत म्हटले आहे की, माजी भारतीय कर्णधार स्मार्ट क्रिकेट माईंड ठेवतो. धोनी हा क्रिकेट जगातील सर्वात हुशार खेळाडू आहे. मी असं तो भारतीय असल्यामुळे म्हणत नाहीये, कारण मला तो तसाच दिसला आहे. सायमन टॉफेल यांनी क्रिकेट वर्ल्डला सांगितले की, तो आश्चर्यकारकपणे रणनीती बनवणारा चिंतक आहे आणि त्याच्याकडे उत्तम क्रिकेट ब्रेन आहे. त्याचा स्वभाव आणि संयम आश्चर्यकारक आहे.

या संभाषणादरम्यान टॉफेल यांनी केप टाऊनमधील एका कसोटी सामन्याचा उल्लेख केला, जेव्हा स्लो ओव्हर रेटसाठी धोनीला दंड ठोठावला गेला. ते म्हणाले की, श्रीशांत केपटाऊनमध्ये ओव्हर टाकण्यासाठी ७-८ मिनिटे घेत होता, त्यामुळे आम्हाला धोनीला कमी ओव्हर रेटचा दंड ठोठावा लागला. यानंतर पंच व धोनी ड्रेसिंग रूममध्ये बसले होते, आम्ही त्यांच्याशी ओव्हर रेटबद्दल बोलत होतो. टॉफेल पुढे म्हणाले, ‘आम्ही धोनीला सांगितले होते की जर त्याने डरबनमध्येही अशीच चूक पुनरावृत्ती केली तर त्याला मॅच बंदीचा सामना करावा लागू शकतो.‘

यावर धोनी म्हणाला की, ’ठीक आहे मला ब्रेक हवा आहे. मी सामना संपवून निघून जाईल. पण श्रीसंत त्या सामन्यात खेळत नाहीये, म्हणून काळजी करण्याची गरज नाही.’ धोनीने ९० कसोटी सामन्यांमध्ये ३८.१ च्या सरासरीने ४८७६ धावा केल्या आहेत. त्याने ३५० एकदिवसीय सामन्यात १०७७३ धावा केल्या आहेत. धोनीने ९८ टी-२० मध्ये ३७.६ च्या सरासरीने १६१७ धावा केल्या आहेत.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com