IND vs ENG 1st Test : रुटच्या शतकानं इंग्लंड भक्कम स्थितीत

भारत विरुद्ध इंग्लंड संघात आजपासून (५ फेब्रुवारी) ४ सामन्यांची कसोटी मालिका सुरु झाली आहे.
IND vs ENG 1st Test : रुटच्या शतकानं इंग्लंड भक्कम स्थितीत

दिल्ली l Delhi

भारत विरुद्ध इंग्लंड संघात आजपासून (५ फेब्रुवारी) ४ सामन्यांची कसोटी मालिका सुरु झाली आहे. या मालिकेतील पहिला सामना चेन्नईच्या एमए चिदंबरम स्टेडियमवर (चेपॉक स्टेडियम) होत आहे. या सामन्यात इंग्लंडकडून कर्णधार जो रुटने पहिल्या डावात शतकी खेळी केली आहे.

नाणेफेक जिंकून इंग्लंडने प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. सलामीवीर रॉरी बर्न्स आणि डॉम सिबली यांनी अत्यंत संथ सुरूवात केली. काही वेळाने अश्विनच्या गोलंदाजीवर हल्ला चढवण्याचा प्रयत्न करताना रॉरी बर्न्स झेलबाद झाला. त्याने ६० चेंडूत ३३ धावा केल्या. त्यानंतर नवखा डॅन लॉरेन्स धावांचं खातंही उघडू शकला नाही. पाचव्या चेंडूवर त्याला बुमराहने पायचीत केले. पण त्यानंतर पहिलं सत्र आणि दुसरं संपूर्ण सत्र सिबली-रूट जोडीने खेळून काढलं. रूटने दमदार शतक झळकावलं तर सिबलीने आपली लय कायम राखत त्याला साथ दिली. रूट-सिबलीने २०० धावांची भागीदारी केली. परंतु दिवसाचा खेळ संपण्यासाठी काहीच चेंडू शिल्लक असताना सिबली १२ चौकारांसह ८७ धावांवर पायचीत झाला आणि खेळ थांबवण्यात आला. जो रूट १४ चौकार आणि १ षटकारासह १२८ धावांवर खेळत आहे. भारताविरूद्धच्या पहिल्या कसोटी सामन्याच्या पहिल्या दिवसअखेर इंग्लंडच्या संघाने ३ बाद २६३ धावांपर्यंत मजल मारत खेळावर पूर्ण वर्चस्व राखलं आहे.

दरम्यान, भारताविरुद्ध आपला १०० वा टेस्ट सामना खेळणाऱ्या इंग्लंड कर्णधार जो रूटने शंभरी धावसंख्या गाठली आणि फलंदाजांच्या एलिट यादीत स्थान पटकावले. भारतीय संघाविरुद्ध रूटने ११० चेंडूत कसोटी सामन्यात सलग तिसरे शतक ठोकले. यापूर्वी रूटने श्रीलंकाविरुद्ध २२८ आणि १८६ धावा केल्या होत्या. आपला १०० वा कसोटी सामना खेळत शतकी धावसंख्या गाठणाऱ्या काही मोजक्या फलंदाजांच्या यादीत आता रूटचाही समावेश झाला आहे. ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार रिकी पॉन्टिंग, पाकिस्तानचे जावेद मियांदाद व इंझमाम-उल-हक, इंग्लंडचे माजी फलंदाज कॉलिन कौड्रे आणि अ‍ॅलेक स्टीवर्ट, वेस्ट इंडिजच्या गॉर्डन ग्रीनिज आणि दक्षिण आफ्रिकेच्या ग्रिम स्मिथ व हाशिम आमला यांच्यानंतर कसोटी क्रिकेटमध्ये हा मैलाचा दगड गाठणारा ९ वा फलंदाज ठरला. रूटचे भारतातील हे दुसरे तर एकूण टेस्ट करिअर मधील २० वे शतक ठरले. तसेच रुट सर्वात कमी वयात १०० टेस्ट खेळणारा तिसरा खेळाडू आहे. अ‍ॅलिस्टर कुक सर्वात कमी वयात १०० टेस्ट मॅच खेळणारा खेळाडू आहे. कुकने २८ वर्ष ३५३ दिवसात १०० वा कसोटी सामना खेळला होता. तर सचिन तेंडुलकरने वयाच्या २९ वर्ष १३४ दिवशी १०० कसोटी खेळण्याचा कारनामा केला होता. सचिनने २००२ मध्ये ही कामगिरी केली होती. आणि आता रूटने ता दिग्गजांच्या यादीत स्थान पटकावले. रुटने ३० वर्ष ३७ दिवशी ही विशेष कामगिरी केली आहे. योगायोगाने, रूटने भारताविरुद्ध देखील पहिला आणि ५० वा कसोटी सामना खेळला होता. आणि एकाच देशाविरुद्ध पदार्पण आणि १०० वा कसोटी सामना खेळणारा तो तिसरा क्रिकेटपटू ठरला आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com