T20 World Cup 2021 : आज रंगणार दोन डबल हेडर सामने

T20 World Cup 2021 : आज रंगणार दोन डबल हेडर सामने

शारजाह | Sharjah

आयसीसी टी २० वर्ल्डकप २०२१ क्रिकेट स्पर्धेत (ICC T20 World Cup 2021) आज शनिवारी डबल हेडर सामने रंगणार आहेत. पहिला सामना शारजाह येथे श्रीलंका (srilanka) आणि दक्षिण आफ्रिका (south africa) या दोन संघांमध्ये होणार आहे...

आजचा सामना दोन्ही संघांच्या दृष्टीने महत्वाचा असणार आहे. श्रीलंका संघाने आपल्या सलामी सामन्यात बांगलादेश संघावर विजय संपादन करून यंदाच्या विश्वचषकात विजयी सुरुवात केली होती.

मात्र दुबई येथे झालेल्या दुसऱ्या सामन्यात कांगारूंनी श्रीलंकेचा विजयरथ रोखला. तर दुसरीकडे ऑस्ट्रेलिया संघाविरुद्ध सलामी सामन्यात दक्षिण आफ्रिकेला पराभवाचा सामना करावा लागला होता.

मात्र दुसऱ्या सामन्यात विंडीजविरुद्ध दुबईमध्ये झालेल्या सामन्यात विजय मिळवून आपला विजयीरथ परत काबीज केला आहे. आजच्या सामन्यात आपला विजयीरथ असाच कायम राखण्याचा दोन्ही संघांचा मानस असणार आहे.

दोन्ही संघांमध्ये अनेक मातब्बर आणि अनुभवी खेळाडू असल्यामुळे सामना चुरशीचा होईल अशी आशा आहे. बाद फेरीत आपला प्रवेश निश्चित करण्यासाठी दोन्ही संघाना विजय अनिवार्य असणार आहे. शिवाय दक्षिण आफ्रिका आणि श्रीलंका आतापर्यंत टी २० वर्ल्डकपमध्ये दोन वेळा एकमेकांसमोर आले आहेत. यात दोन्ही संघांनी १-१ विजय मिळवला आहे.

इंग्लंड, ऑस्ट्रेलिया तिसऱ्या विजयासाठी झुंजणार

आयसीसी टी २० वर्ल्डकप २०२१ (ICC T20 World Cup 2021) मध्ये आज शनिवारी दुसरा सामना दुबईमध्ये इंग्लंड (england) आणि ऑस्ट्रेलिया (australia) संघांमध्ये रंगणार आहे. दोन्ही संघांनी आपले सलामीचे दोन्ही सामने जिंकले असल्यामुळे दोन्ही संघांमध्ये फलंदाजी आणि गोलंदाजीत प्रचंड संतुलन आहे. दोन्ही सामने जिंकल्यामुळे दोन्ही संघांचा आत्मविश्वास दुणावलेला आहे.

आजच्या सामन्यात विजय मिळवून स्पर्धेतील आपला तिसरा विजय नोंदवण्यासाठी दोन्ही सज्ज असून इंग्लंड संघ ४ गुणांनी गुणतालिकेत सरस धावगतीच्या बळावर आघाडीवर आहे. तर ऑस्ट्रेलिया ४ गुणांनी दुसऱ्या स्थानावर आहे. २०१० साली झालेल्या टी २० वर्ल्डकपच्या अंतिम सामन्यात इंग्लंड संघाने कांगारूंना पराभूत केले होते.

या पराभवाचा वचपा काढण्यासाठी ऑस्ट्रेलिया मैदानात उतरणार आहे. ऑस्ट्रेलिया संघासाठी जमेची बाजू म्हणजे कर्णधार एरन फिंच आणि डेविड वॉर्नर लयीत परतले आहेत. तर गोलंदाजीतही मिचेल स्टार्क जोश हेझलवूड आणि पॅट कमिन्स फॉर्मात आहेत. तसेच फिरकीपटू एडम झाम्पाला लय गवसली आहे. त्यांना आपल्या कामगिरीत सातत्य राखणे गरजेचे आहे.

इंग्लंड संघासाठी मोईन अलीने गोलंदाजीत महत्वपूर्ण योगदान दिले आहे. मोक्याच्या क्षणी विकेट्स काढून संघाच्या विजयाचा पाया मजबूत केला आहे. त्याला टिमॉल मिल्स आणि आदिल रशीद क्रिस वोक्सने साथ दिली आहे. सलामीवीर जेसन रॉयला फॉर्म गवसला आहे.

बांगलादेशविरुद्ध सामन्यात शानदार अर्धशतक ठोकून त्याने महत्वपूर्ण योगदान दिले आहे. मात्र सलामीवीर जोस बटलरची बॅट अद्याप तळपलेली नाही. त्यामुळे इंग्लंडची चिंता वाढली आहे. आजच्या सामन्यात बटलर लयीत परतणार का? ते पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

सलिल परांजपे, नाशिक.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com