T20 World Cup 2021 Semi Final : ऑस्ट्रेलिया, पाकिस्तान उपांत्य फेरीसाठी झुंजणार

T20 World Cup 2021 Semi Final : ऑस्ट्रेलिया, पाकिस्तान उपांत्य फेरीसाठी झुंजणार

दुबई | Dubai

आयसीसी टी २० वर्ल्डकप २०२१ चा (ICC T20 World Cup 2021) दुसरा उपांत्य सामना (Semi Final) आज दुबईमध्ये (Dubai) सायंकाळी ७:३० वाजता ऑस्ट्रेलिया (Australia) आणि पाकिस्तान (Pakistan) संघांमध्ये होणार आहे...

काल बुधवारी झालेल्या पहिल्या सामन्यात न्यूझीलंडने (New Zealand) इंग्लंडवर (England) मात करून पहिल्यांदा अंतिम फेरीत आपले स्थान निश्चित केले आहे. आता अंतिम सामन्यात (Final Match) आपले स्थान निश्चित करण्यासाठी पाकिस्तान (PAK) आणि ऑस्ट्रेलिया (AUS) आज मैदानात उतरणार आहे.

साखळी सामन्यात आपले सर्व पाचही सामने जिंकल्यामुळे सातत्यपूर्ण कामगिरी करणारा पाकिस्तान आता आपला सलग सहावा सामना जिंकून अंतिम फेरीत आपले स्थान निश्चित करण्यासाठी सज्ज आहे. २००९ मध्ये झालेल्या विश्वचषकात पाकिस्तान संघाने प्रथम विश्वचषक जिंकला होता. आता त्या इतिहासाची पुनरावृत्ती करण्यासाठी पाकिस्तान संघाला संधी आहे.

आतापर्यंत झालेल्या पाचही सामन्यांमध्ये पाकिस्तान संघाने एक संघ म्हणून फलंदाजी आणि गोलंदाजीच्या बळावर सांघिक खेळ केला आहे. आयसीसी टी २० वर्ल्डकप २०१० मध्ये उपांत्य सामन्यात हे दोन संघ आमनेसामने आले होते.

या सामन्यात ऑस्ट्रेलियाच्या माईक हसीने केलेल्या निर्णायक फलंदाजीमुळे ऑस्ट्रेलिया संघाने पाकिस्तानला पराभूत करून अंतिम फेरीत आपले स्थान निश्चित केले होते. या पराभवाची सर्रास परतफेड करण्यासाठी बाबर आझमचा पाकिस्तान संघ ऑस्ट्रेलियाला पराभूत करण्यात यशस्वी होईल का? ते पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

आयसीसी टी २० वर्ल्डकप स्पर्धेला सुरुवात होण्यापूर्वी ऑस्ट्रेलिया अंतिम चार संघात आपले स्थान मिळवू शकेल का? असा सवाल सर्वत्र उपस्थित केला जात होता. सुपर १२ मध्ये आपल्या सलामी सामन्यात दक्षिण आफ्रिकेविरुद्ध थरारक विजय नोंदवून विजयी सुरुवात करणाऱ्या ऑस्ट्रेलिया संघाला दुसऱ्या सामन्यात इंग्लंडविरुद्ध दारुण पराभवाचा सामना करावा लागला होता.

मात्र स्पर्धेतील आपले आव्हान धोक्यात असतानाच ऑस्ट्रेलिया संघाने निर्णायक क्षणी आपली गाडी रुळावर आणून प्रतिस्स्पर्धी संघावर आक्रमक फलंदाजी आणि भेदक गोलंदाजीच्या बळावर दडपण मिळवून विजयी लय प्राप्त करत अंतिम ४ मध्ये आपले स्थान निश्चित केले आहे.

शिवाय सलामीवीर डेविड वॉर्नर कर्णधार एरन फिंच ग्लेन मॅक्सवेल यांनी आपल्या संघाला अडचणीतून बाहेर काढत संघाच्या विजयात मोलाचा वाटा उचलला आहे. मात्र ऑस्ट्रेलिया संघासाठी चिंतेची बाब म्हणजे स्टीव्ह स्मीथची बॅट अद्याप तळपलेली नाही. तो धावा जमवण्यासाठी अजूनही संघर्ष करत आहे.

गोलंदाजीत मिचेल स्टार्क, जोश हेझलवूड, पॅट कमिन्स अचूक टप्प्यावर गोलंदाजी करून प्रतिस्पर्धी संघावर दडपण टाकत आहेत. तसेच फिरकीपटू एडम झाम्पाची फिरकी प्रतिस्पर्धी संघासाठी डोकेदुखी ठरत आहे. अष्टपैलू ग्लेन मॅक्सवेल आपल्या गोलंदाजीतूनही संघाला निर्णायक क्षणी बळी मिळवून देऊन संघाच्या विजयात मोलाचा वाटा उचलत आहेत. दोन्ही संघाची फलंदाजी आणि गोलंदाजी तोडीसतोड आल्यामुळे सामना चुरशीचा होईल यात काही शंका नाही.

सलिल परांजपे, नाशिक.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com