T20 World Cup 2021 : भारत, न्यूझीलंड कोण उघडणार विजयाचे खाते?

T20 World Cup 2021 : भारत, न्यूझीलंड कोण उघडणार विजयाचे खाते?

दुबई | Dubai

आयसीसी टी २० वर्ल्डकप २०२१ मध्ये (ICC T20 World Cup 2021) आज सुपर १२ मध्ये भारताची (India) गाठ न्यूझीलंड (New Zealand) संघाशी पडणार आहे. हा सामना सायंकाळी ७:३० वाजता दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट मैदानावर होणार आहे...

दुबई येथे पाकिस्तानविरुद्ध (Pakistan) झालेल्या पहिल्या सामन्यात भारतीय संघाला १० विकेट्सने पराभवाचा सामना करावा लागला होता. आता ७ दिवसांच्या विश्रांतीनंतर टीम इंडिया (Team India) आज मैदानात उतरणार आहे. तर न्यूझीलंड संघालाही (Team New Zealand) पाकिस्तान संघाने पराभवाची धूळ चारली आहे. आजचा सामना दोन्ही संघांसाठी महत्वपूर्ण असणार आहे.

भारत (IND) आणि न्यूझीलंड (NZ) आतापर्यंत टी २० सामन्यांमध्ये १६ वेळा एकमेकांसमोर आले आहेत. तर या सर्व लढतींमध्ये दोन्ही संघांनी ८-८ विजय मिळवले आहेत. तर भारत आणि न्यूझीलंड टी २० वर्ल्डकप क्रिकेट स्पर्धेत २ वेळा एकमेकांसमोर आले आहेत. यात दोन्ही सामन्यांमध्ये किवी संघाने विजयश्री साजरी केली आहे.

भारतीय संघ आणि न्यूझीलंड संघांमध्ये आयसीसी स्पर्धांमध्ये आजवर झालेल्या सर्व सामन्यांमध्ये न्यूझीलंड संघ भारतावर वरचढ ठरला आहे. २००३ साली दक्षिण आफ्रिकेत (South Africa) झालेल्या ५० षटकांच्या वर्ल्डकपमध्ये सौरव गांगुलीच्या नेतृत्वात भारताने न्यूझीलंडला नमवले होते. पाकिस्तानविरुद्ध सलामी सामन्यात भारताला पराभव पत्कारावा लागल्यानंतर आजच्या निर्णायक सामन्यात भारतीय संघात काही बदल अपेक्षित आहेत.

फिरकीपटू वरुण चक्रवर्तीजागी अनुभवी आर अश्विन, तर भुवनेश्वर कुमारच्याजागी शार्दूल ठाकूर आणि रिषभ पंतजागी ईशान किशनला अंतिम ११ मध्ये संधी मिळण्याची शक्यता आहे. भारतीय संघासाठी न्यूझीलंडविरुद्ध सामन्यापूर्वी एक आनंदाची बातमी समोर आली आहे.

अष्टपैलू हार्दिक पंड्याने नेट्समध्ये गोलंदाजीचा कसून सराव केला आहे. यात त्याने आपण न्यूझीलंडविरुद्ध गोलंदाजीसाठी फिट असल्याचे सिद्ध केले आहे. मात्र भारतीय संघासाठी चिंतेची बाब म्हणजे रोहित शर्मा, सूर्यकुमार यादव आणि लोकेश राहुल पाकिस्तानविरुद्ध लढतीत सपशेल अपयशी ठरले होते. आजच्या निर्णायक सामन्यात त्यांना फॉर्म गवसण आवश्यक आहे.

तर भारताप्रमाणेच न्यूझीलंड संघातही सामन्याचे चित्र एकहाती फिरवू शकणारे फलंदाज आणि गोलंदाज आहेत. त्यामुळे एक रोमांचक सामना पाहण्याची संधी क्रिकेटप्रेमींना मिळणार आहे.

सलिल परांजपे, नाशिक.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com