SRH vs RR : हैद्राबादचा दमदार विजय; राजस्थानचा ७ गडी राखून पराभव

SRH vs RR : हैद्राबादचा दमदार विजय; राजस्थानचा ७ गडी राखून पराभव

दुबई | dubai

जेसन रॉयचे अर्धशतक आणि केन विल्यमसनच्या खेळीच्या जोरावर सनरायझर्स हैद्राबादने (SRH) राजस्थान रॉयल्सवर (RR) ७ गड्यांनी मात दिली...

यंदाच्या हंगामातील हैद्राबादचा हा दुसरा विजय आहे. कर्णधार संजू सॅमसनच्या ८२ धावांच्या जोरावर राजस्थान रॉयल्सने २० षटकात ५ बाद १६४ धावा केल्या.

हैद्राबादसाठी जेसन रॉयने पदार्पणात अर्धशतकी खेळी करत संघाला उत्तम सुरुवात मिळवून दिली. तो बाद झाल्यानंतर विल्यमसनने अर्धशतक ठोकत संघाला विजय मिळवून दिला. सलामीवीर फलंदाज जेसन रॉयला सामनावीर पुरस्कार देण्यात आला.

डेव्हिड वॉर्नरच्या बदली संधी मिळालेला जेसन रॉय आणि वृद्धिमान साहा या हैद्राबादची सलामीवीरांनी दमदार सलामी देत पाचव्या षटकात अर्धशतकी भागीदारी केली.

संजूने पॉवरप्लेचे शेवटचे षटक महिपाल लोमरोरला दिले. महिपालच्या षटकात साहा यष्टीचीत झाला. साहाने १८ धावा केल्या. साहा बाद झाल्यावर केन विल्यमसन मैदानात आला. जेसन रॉयने विल्यमसह अर्धशतकी भागीदारी रचली.

११ व्या षटकात रॉयने राहुल तेवतिच्या षटकात चौकार खेचत आपले अर्धशतक फलकावर लावले. रॉयच्या फटकेबाजीमुळे हैद्राबादला या षटकात २१ धावा जोडता आल्या. पुढच्याच षटकात चेतन साकारियाने रॉ़यला बाद केले. रॉयने ८ चौकार व एका षटकारासह ८० धावा केल्या.

त्यानंतर हैद्राबादला आणखी एक धक्का बसला. वेगवान गोलंदाज मुस्तफिझूर रहमानने नवा फलंदाज प्रियम गर्गला शून्यावर झेलबाद केले. मुस्तफिझूरने आपल्याच गोलंदाजीवर गर्गचा झेल घेतला.

त्यानंतर केन विल्यमसनने मोर्चा सांभाळला. त्याने अभिषेक शर्मासोबत उपयुक्त भागीदारी रचली. १९व्या षटकात विल्यमसनने मुस्तफिझूरला चौकार खेचत संघाच्या विजयासोबत आपल्या अर्धशतकावर शिक्कामोर्तब केले. त्याने ५ चौकार आणि एका षटकारासह नाबाद ५१ धावांची खेळी केली. अभिषेक २१ धावांवर नाबाद राहिला.

एविन लुईस आणि यशस्वी जयस्वाल यांनी राजस्थानच्या डावाची सुरुवात केली. मात्र लुईसला मोठी खेळी करता आली नाही. हैद्राबादचा गोलंदाज भुवनेश्वर कुमारने त्याला स्वस्तात बाद केले.

त्यानंतर यशस्वीकडून आक्रमक फटके पाहायला मिळाले. कप्तान संजू सॅमसनसह यशस्वीने पहिल्या पॉवरप्लेमध्ये संघासाठी १ बाद ४९ धावा केल्या. चांगली लय पकडलेल्या यशस्वीला संदीप शर्माने नवव्या षटकात क्लीन बोल्ड केले.

यशस्वीने ५ चौकार आणि एका षटकारासह ३६ धावा केल्या. त्यानंतर आलेला लियाम लिव्हिंगस्टोन राशिद खानचा बळी ठरला. ११ षटकात राजस्थानने ३ बाद ८१ धावांपर्यंत मजल मारली. १४ व्या षटकात राजस्थानने शतकी धावसंख्या गाठली.

त्यानंतर कप्तान संजू सॅमसनने सिद्धआर्थ कौलला चौकार खेचत आपले अर्धशतक पूर्ण केले. कौलच्या १६व्या षटकात संजूने २० धावा कुटल्या. शेवटच्या दोन षटकात हैद्राबादने कमबॅक करत संजू-महिपालला जास्त धावा करु दिल्या नाहीत. शेवटच्या षटकात कौलच्या गोलंदाजीवर संजू झेलबाद झाला. त्याने ७ चौकार आणि ३ षटकारांसह ८२ धावांची खेळी केली. कौलने या षटकात चार धावा दिल्या.

Related Stories

No stories found.