
नाशिक | प्रतिनिधी | Nashik
नाशिककरांसाठी आनंदाची बातमी समोर आहे. नवी दिल्ली येथील आर. के. खन्ना स्टेडियम, लॉन टेनिस असोसिएशन येथे आयटीएफ वर्ल्ड टूर टेनिस मास्टर एम. टी. ४०० स्पर्धेत नाशिकचे टेनिसपटू श्रीकांत कुमावत यांनी विजेतेपद पटकावले आहे...
ही स्पर्धा दि. २३ ते २८ जानेवारी या कालावधीत येथे आयोजित करण्यात आली होती. यात नाशिक जिल्ह्यातील निवेक क्लबचे टेनिसपटू श्रीकांत कुमावत यांनी एकेरी गटात सेमीफायनलमध्ये इंदोर येथील आय. के. महाजन यांचा २-६, ६-४, ६-३ असा पराभव करत दणदणीत विजय मिळवत कुमावत यांनी अंतिम सामन्यात प्रवेश केला. विशेष म्हणजे आय के महाजन हे यंदा इंडियन टीमसोबत होणाऱ्या वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये खेळायला जाणार होते.
कुमावत यांनी अंतिम सामन्यात दिल्ली येथील खेळाडू राहुल बेलवाड यांचा ६-३, ६-४ असा पराभव करत स्पर्धेचे विजेतेपद पटकावले. कुमावत यांनी प्रथमच ३५ वर्षावरील वयोगटात स्पर्धा खेळण्यासाठी भाग घेतला होता.
यापूर्वी श्रीकांत कुमावत हे २००६-२०११ या सलग ५ वर्षाच्या कालावधीत पुणे विद्यापीठाचे कर्णधार राहिले आहेत. तसेच ज्युनिअर नॅशनल स्पर्धेचे ४ वेळेस विजेतेपद पटकावले आहे. सध्या कुमावत हे अजिंक्य बच्छाव यांच्यासोबत रोज सकाळी दीड तास सराव तर १ तास निवेक क्लब येथे फिटनेस करतात. पुढीलवर्षी भारताचे प्रतिनिधत्व करण्याचा कुमावत यांचा मानस आहे.
या यशाबद्दल निवेकचे अध्यक्ष संदीप गोयल, जनक सारडा, पंकज खत्री, रणजीत सिंग, परमिंदर सिंग, रमेश वैश्य, यती गुजराथी यांच्यासह महाराष्ट्र राज्य लॉन टेनिसचे उपाध्यक्ष राजीव देशपांडे यांनी अभिनंदन केले आहे.