<p><strong>नाशिक | Nashik</strong></p><p>संस्थेचा डावखुरा फिरकीपटू सत्यजित बच्छावची यावर्षीदेखील महाराष्ट्र संघातर्फे विजय हजारे ट्रॉफी स्पर्धेकरिता निवड करण्यात आली आहे. प्रथम श्रेणी क्रिकेटची अतिशय महत्वाची हि एकदिवसीय (५० षटकांची) स्पर्धा आहे. दरवर्षी भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (बीसीसीआय) तर्फे या स्पर्धेचे आयोजन करण्यात येते.</p> .<p>आतापर्यंतच्या उत्कृष्ट कामगिरीच्या जोरावर सत्यजित हा महाराष्ट्र संघाचा महत्वाचा गोलंदाज ठरला आहे. विजय हजारे ट्रॉफी स्पर्धेकरिता याआधी २३ सामन्यांत त्याने महाराष्ट्र संघातर्फे ४२ बळी घेतले आहेत. भेदक गोलंदाजीबरोबर खालच्या फळीतील आक्रमक फलदांजीनेदेखील त्याने अनेकदा संघाला विजय मिळवून दिला आहे. सत्यजितच्या निवडीमुळे नासिक जिमखान्यात व जिल्हा संघात तसेच जिल्ह्यातील क्रिकेट रसिकांमध्ये अतिशय आनंदाचे वातावरण तयार झाले आहे. संस्थेचे अध्यक्ष नरेंद्रजी छाजेड, सचिव राधेश्याम मुंदडा, सहसचिव शेखर भंडारी, क्रिकेट सचिव अलीअसगर आदमजी तसेच संघ प्रशिक्षक संजय मराठे व संस्थेचे पदाधिका-यानी सत्यजितचे अभिनंदन करून स्पर्धेतील उत्तम कामगिरीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत. विजय हजारे ट्रॉफी स्पर्धेकरिता महाराष्ट्र संघाचा समावेश एलिट मधील डी गटात असून २१ फेब्रुवारी ते १ मार्चपर्यंत एक दिवस आड हिमाचल प्रदेश, मुंबई राजस्थान, दिल्ली व पाँडेचेरी संघातर्फे लढती रंगणार आहेत.</p>