सचिनचा मास्टर स्ट्रोक : २१ व्या शतकातील सर्वोत्तम खेळाडू

सचिनचा मास्टर स्ट्रोक : २१ व्या शतकातील सर्वोत्तम खेळाडू

मुंबई | Mumbai

क्रिकेटमधील सर्व क्रीडाप्रेमींचा देव आणि मास्टर ब्लास्टर या उपाधीने लोकप्रिय खेळाडू म्हणून सर्वांच्या मनावर अधिराज्य गाजवणारा महान फलंदाज सचिन तेंडुलकर २१ व्या शतकातील सर्वोत्कृष्ट फलंदाज ठरला आहे...

स्टार स्पोर्ट्सने जाहीर केलेल्या पोलमध्ये सचिनने २१ व्या शतकातील सर्वोत्तम फलंदाजांच्या शर्यतीत श्रीलंकेचा माजी कर्णधार आणि डावखुरा यष्टीरक्षक फलंदाज कुमार संगकारा याला पराभूत केले आहे. स्टार स्पोर्ट्सच्या समालोचन पॅनलमध्ये व्ही. व्ही. एस. लक्ष्मण, आकाश चोप्रा आणि इरफान पठाण यांचा समावेश करण्यात आला होता.

भारतीय संघाचे माजी कर्णधार आणि लिटिल मास्टर म्हणून परिचित असलेले सुनील गावस्कर म्हणाले, सचिन तेंडुलकर आणि कुमार संगकारा यांच्यात कडवी झुंज पाहायला मिळाली.

सचिनने ८ वर्षांपूर्वीच क्रिकेटमधून रामराम ठोकला होता. कसोटी क्रिकेटमध्ये अनेक विक्रम सचिनच्या नावावर आहेत. सचिनने कसोटी सामन्यांमध्ये एकूण १५,९२१ धावा काढल्या आहेत. आणि तो क्रिकेटच्या सर्वात मोठ्या प्रकारात सर्वाधिक धावा करणारा खेळाडू आहे.

सचिनने कसोटी सामन्यांमध्ये आतापर्यंत ५१ शतके ठोकली आहेत. कसोटी क्रिकेट सामन्यांमध्ये कुमार सांगकाराने एकूण ३८ शतके झळकावली असून, सर्वाधिक शतके ठोकणाऱ्या फलंदाजांच्या यादीत तो चौथ्या स्थानावर विराजमान आहे.

कसोटी क्रिकेट सामन्यांमध्ये सर्वाधिक धावा काढणाऱ्या फलंदाजांच्या यादीत संगकारा सहाव्या स्थानावर आहे. सचिन तेंडुलकरने आपल्या वयाच्या १६ व्या वर्षी कसोटी क्रिकेट सामन्यांमध्ये पदार्पण केले होते. वयाच्या १७ व्या वर्षी कसोटी सामन्यांमधील त्याने आपले पहिले शतक झळकावले होते. अशी कामगिरी करणारा तो पहिलाच युवा खेळाडू ठरला होता.

सलिल परांजपे, नाशिक

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com