
मुंबई | Mumbai
क्रिकेटचा देव अर्थात मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर याने आज त्याच्या आयुष्याच 'अर्धशतक' पुर्ण केल आहे. क्रिकेटचा देव, मास्टर ब्लास्टर, लिटल मास्टर, गॉड ऑफ क्रिकेट अशी सचिनला त्याच्या चाहत्यांनी दिलेली बिरुदं. सचिनला फक्त भारतातच नव्हे तर संपुर्ण जगात क्रिकेटमध्ये सर्वोच्च स्थान मिळाल आहे, अस म्हंटल तरी खोट ठरणार नाही. सचिनने त्याच्या प्रदिर्घ कारकिर्दीत अनेक मोठ मोठे विक्रमांना गवसणी घातली आहे, जी सहजासहजी कोणालाही मोडता कठीण आहे. तो या शतकातील सर्वोत्तम क्रिकेटपटू असल्याच अनेक दिग्गज खेळाडूंनी या आधीच सांगितलं आहे...
अप्रतिम प्रतिभेसह जन्माला आलेला, कठोर परिश्रमाने आपले आयुष्य घडविणारा आणि योग्य वेळी योग्य त्या दिशेने पैलू पाडण्यात आचरेकर सरांसारखा गुरू लाभणारा सचिन तेंडुलकर हा क्रिकेटचा देव कधी बनला ते समजलज नाही. संपूर्ण जग त्याला क्रिकेटचा जिवंत देव मानतो. याचे कारण म्हणजे जसे ‘टाकीचे घाव सोसल्याशिवाय देवपण येत नाही’ तसेच त्यानेदेखील अनेक संकटे, दु:ख, वेदना, अपयश सहन करीत हे यश मिळवले आहे. सचिन रमेश तेंडुलकरने क्रिकेटच्या सर्व फॉरमॅटमध्ये असंख्य विक्रम रचले आहे आणि एक बेंचमार्क सेट केला आहे, जो केवळ त्याच्यापेक्षा प्रतिभावान, कठोर परिश्रम करणारा आणि विशेष कामगिरी करणाराच कोणीतरी मोडू शकतो.
सचिन दहा वर्षांचा असताना भारतीय क्रिकेट संघाने १९८३ मध्ये वर्ल्ड कप जिंकला होता. तेव्हा प्रेरणा घेत सचिनने क्रिकेटच्या मैदानात पाऊल टाकलं होत. वयाच्या १४व्या वर्षी त्याला वेगवान गोलंदाज व्हायचं होतं, त्यासाठी तो चेन्नईत प्रशिक्षणासाठीही गेला होता. पण डेनिस लिलीने त्याला रिजेक्ट केलं होतं.
पुढे जाऊन सचिनने शालेय क्रिकेटमध्ये विनोद कांबळीसोबत केलेल्या ६६४ धावांच्या विक्रमी भागिदारीनंतर सचिन प्रकाशझोतात आला होता. यात सचिनने ३२६ धावा केल्या होत्या त्यावेळी सचिनचे प्रशिक्षक रमाकांत आचरेकर होते. आचरेकर हे सचिनला आऊट न होण्याचा सल्ला देत असत. पूर्ण सिझनमध्ये बाद न झाल्यास आचरेकर सचिनला गिफ्ट म्हणून नाणं द्यायचे. सचिनकडे अशी 13 नाणी आहेत.
दरम्यान, सचिन पेक्षा विनोद कांबळीची क्रिकेट कारकीर्द फार कमी आणि वादांनी वेढलेली होती. मात्र सचिन हा कुठल्याही वादात त्याच्या २४ वर्षांच्या कारकिर्दीत सापडला नाही, हेच त्याच्यावर झालेले चांगले संस्कार दर्शवतात.
१९८७चा वर्ल्डकप भारतात आयोजित करण्यात आला होता. तेव्हा सचिन वानखेडे स्टेडियमवर भारत विरुद्ध झिम्बॉब्वे सामन्यात बॉल बॉय होता. सचिन क्रिकेट किट घेऊनच झोपत असे. रणजी ट्रॉफी, दलीप ट्रॉफी, ईराणी ट्रॉफीच्या पदार्पणातच शतक करण्याचा विक्रम सचिनच्या नावावर आहे.
वीरेंद्र सेहवाग, हरभजन सिंग, युवराज सिंग आणि विराट कोहली यांच्यासह त्याचे सहकारी क्रिकेटपटू त्याला 'सचिन पाजी' या नावाने हाक मारतात. परदेशातही त्याला आदराने ‘सचिन सर’या नावाने बोलावतात. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ३०,००० हून अधिक धावा (३४,३५७) करणारा सचिन हा एकमेव क्रिकेटर आहे. २४ वर्षांच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीत सचिनने भारतासाठी सर्व फॉरमॅटमध्ये ३४,३५७ धावा केल्या.
त्याच्या कसोटी क्रिकेटमध्ये १५,९२१ धावा आहेत. सर्वाधिक कसोटी शतके (५१) आणि सर्वाधिक कसोटी सामने खेळण्याचा (२००) विक्रम त्याच्या नावावर आहे. या फॉरमॅटमध्ये त्याच्याकडे सर्वाधिक चौकार (२०५८) आहेत आणि तो सर्वात जलद १५,००० कसोटी धावा करणारा फलंदाज आहे. यासोबतच सचिन तेंडुलकर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक सामने खेळणारा क्रिकेटर आहे.
त्याने सर्वाधिक 664 सामने खेळले असून यात 200 कसोटी, 463 एकदिवसीय आणि एका टी20 सामन्याचा समावेश आहे. हा विश्वविक्रम आजही सचिनच्या नावावर आहे. ऑस्ट्रेलियाचे आक्रमक खेळाडू असो किंवा पाकिस्तानचा शोएब अख्तर असो. प्रत्येक गोलंदाजापुढे सचिनं फलंदाजीसाठी उभा असला की त्याला बाद करायचं कसं याचीच गणितं विरोधी संघातील खेळाडू करत होते. सचिन मात्र शांतपणे यायचा, अप्रतिम फटकेबाजी करायचा आणि मैदान गाजवून निघून जायचा. कव्हर ड्राईव्ह, स्ट्रेट कट हे त्याचे हातखंड असणारे शॉट्स.
सचिनबद्दल असे म्हटले जाते की, त्याने रागाच्या भरात कधीही कोणतीही टिप्पणी केली नाही. एखाद्या खेळाडूने कधी त्याच्याविरुद्ध स्लेजिंग केले तरी, त्याला तो तोंडाने उत्तर देण्याऐवजी त्याच्या बॅटने प्रत्युत्तर देत असे. सचिन जेव्हा जेव्हा फलंदाजीला उतरायचा तेव्हा तो मैदानावर येण्यापूर्वी सूर्यदेवाला नतमस्तक व्हायचा.
त्याच्या क्रिकेटबद्दलच्या प्रेमाबद्दल अस म्हंटल जातं की जेव्हा वर्ल्डकप सुरू होता तेव्हा त्याला त्याच्या वडीलांच्या निधनाची बातमी कळताच तो घरी परतला, वडिलांच्या अंत्यविधीला उपस्थित राहिला आणि पुन्हा देशासाठी विश्वचषक जिंकवून द्यायला परतला. या घटनेवरून त्याच्या क्रिकेटवरील प्रेमाचा अंदाज लावता येतो. त्यानंतर सचिन पुढच्या सामन्यात खेळायला आला आणि त्याने शतक ठोकून आपल्या दिवंगत वडिलांना श्रद्धांजली वाहिली.
सचिनला भारतातील सर्वोच्च असे पुरस्कार प्राप्त झाले आहे. भारताचा सर्वोच्च पुरस्कार मानला जाणारा भारतरत्न हा सन्मान प्राप्त करणारा तो सर्वात तरुण आणि पहिला खेळाडू व्यक्ती आहे. राजीव गांधींच्या नावे खेलरत्न पुरस्काराने सन्मानित होणारा पहिला क्रिकेटपटू आहे. २००७ सालचा पद्मविभूषण पुरस्कारानेही सचिनला सन्मानित करण्यात आले आहे.
त्याने भारतीय क्रिकेटपटूंच्या अनेक पिढ्यांवर प्रभाव टाकला आहे आणि त्याच्या खेळाच्या दिवसात कोट्यवधी भारतीयांची सर्वात मोठी आशा होती. त्याच्या व्यक्तिमत्त्वामुळेच तो महान क्रिकेटपटू आणि अनेकांसाठी क्रिकेटचा देव बनला. अशा या गॉड ऑफ क्रिकेटला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !!